
आप नेते सौरभ भारद्वाज यांच्याशी काही लोक धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये सौरभ भारद्वाज यांनी ईद साजरी करू देण्याचे आवाहन केल्यामुळे लोकांनी त्यांना मारहाण केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पालम येथील अग्निकांडाच्या शोकसभेतील वादाचा आहे. हा ईदच्या काळातील नाही. तसेच उत्तम नगरशीही काहीही संबंध नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक आप नेते सौरभ भारद्वाज यांना धक्काबुक्की करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुस्लिम आमचे भाऊ आहेत… त्यांना ईद साजरी करू द्या, उत्तम नगरमध्ये ‘आप’ पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांना लोकांनी ढकलून दिले, हिंदूंनी खूप चुकीचे केले, त्यांनी फक्त त्यांना ढकलायला नको होते, किमान दोन-चार वेळा तरी त्यांना मारहाण करायला हवी होती.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ उत्तम नगरशी काहीही संबंध नाही.
‘आयएएनएस’या न्यूज एजन्सीने हाच व्हिडिओ 19 मार्च 2026 रोजी ट्विटरवर शेअर केलेला आढळला.
यावरून स्पष्ट झाले की हा व्हिडिओ ईदच्या काळातील नाही.
आयएएनएसच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दिल्लीतील पालम परिसरातील आहे. येथे आम आदमी पार्टी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.
दैनिक भास्करने 19 मार्च 2026 रोजी शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, 18 मार्च रोजी दिल्लीतील पालम परिसरातील चार मजली इमारतीला आग लागली होती. या दुर्घटनेत एका कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात तीन लहान मुलींचाही समावेश होता.
या घटनेनंतर आयोजित शोकसभेदरम्यान आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला होता की, काही लोकांनी त्यांच्यावर खुर्ची फेकली. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
तसेच, सौरभ भारद्वाज यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या व्हायरल दाव्याचे खंडन केले आहे आणि हा प्रकार उत्तम नगरचा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नेमक प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी होळीच्या काळात ‘तरुण कुमार’ नावाच्या तरुणाची मुस्लिम जमावाने मारहाण करून हत्या केली होती. तेव्हापासून दिल्लीच्या या उत्तम नगर भागात तणाव निर्माण झाला होता. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
सोशल मीडियावर असा दावा व्हायरल होत आहे की, आप नेते सौरभ भारद्वाज यांनी उत्तम नगरमध्ये जाऊन ईद साजरी करण्याचा सल्ला देत होता. त्याच पार्श्वभूमीवर व्हायरल व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ व्हिडिओ उत्तम नगरचा नसून पालम येथील अग्निकांडानंतर झालेल्या शोकसभेतील आप आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वादाचा आहे. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामवट्विटरयेथे फॉलो करा.)


