
बहुचर्चित कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रस्सीखेच आज अखेर संपली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबापेठतून विजयी झाले. तत्पूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक वादग्रस्त विधान व्हायरल होऊ लागले.
सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने त्यांना कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल असे सांगितले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणअंती कळाले की, हे बनावट ग्राफिक आहे. एकनाथ शिंदे यांनी असे विधान केलेले नसून, सरकारनामा वेबसाईटनेसुद्धा अशी बातमी दिलेली नाही.
काय आहे दावा?
एकनाथ यांचा फोटो आणि सरकारनामा वेबसाईटचा लोगो असणाऱ्या ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “कसबापेठ पोटनिवडणूक संदर्भात माझे आजच निवडणूक आयोगाशी बोलणे झालेय. त्यांनी मला विश्वास दिलाय की त्या ठिकाणी युतीचाच विजय होईल.”

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम
तथ्य पडताळणी
मुख्यमंत्र्यांनी असे वादग्रस्त विधान करणे नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.
सरकारनामा वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरसुद्धा हे ग्राफिक आढळले नाही.
याउलट सरकारनामाच्या फेसबुक पेजवर असणारे ग्राफिक कार्डची निरीक्षण केल्यावर कळाले की, ते व्हायरल ग्राफिकहून वेगळे आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक
फॅक्ट क्रेसेंडोने मग सरकारनामाच्या सोशल मीडिया प्रमुख समृद्धा भांबुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल ग्राफिक बनावट असल्याचे सांगितले. सरकारनामाने अशी कोणतीही बातमी दिली नाही.
वरील ग्राफिक आणि व्हायरल ग्राफिक यांची तुलना केल्यावर लगेच कळते की, सरकारनामाद्वारे वापरला जाणारा फाँट वेगळा आहे. तसेच मूळ डिझाईनमध्ये विधान काळ्या रंगात आणि नाव लाल रंगामध्ये लिहिले जाते. परंतु, व्हायरल ग्राफिकमध्ये लाल रंगामध्येच सगळा मजकूर आहे.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट विधान व्हायरल होत आहे. सरकारनामाचा लोगो लावून फेक ग्राफिक तयार करण्यात आले आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कसबापेठ पोटनिवडणूक: एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणूक आयोगबद्दल खोटे विधान व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
