
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर तडफडत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडियो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचे असे रुग्ण सापडत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049043487) पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.
काय आहे व्हिडियोमध्ये?
32 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये झेब्रा क्रॉसिंगवर एक व्यक्ती खाली तडफडत असल्याचे दिसते. आसपास वाहतूक पोलिस व सफाई कर्मचारीदेखील आहेत. मग रुग्णवाहिका येते आणि पीपीई कीट घातलेले काही कर्मचारी उतरतात व झटपट या व्यक्तीला उचलून रुग्णवाहिकेतून घेऊन जातात.
हा व्हिडियो शेयर करून युजर्स म्हणत आहेत की, “पुण्यातील रस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडण्यास सुरवात झाली आहे. भयानक परिस्थिती आहे. सर्वांनीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या”
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम पुण्यात अशी काही घटना घडली का याचा शोध घेतला. की-वर्ड्सद्वारे सर्च केले असता पुणे मिररची 23 जून रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, पुणे महानगरपालिकेने कोरोनाची एमर्जन्सी केस आल्यावर आरोग्य यंत्रणांची सतर्कता कशी आहे, हे तपासण्यासाठी मंगळवारी डेक्कन कॉर्नर येथे ‘मॉक ड्रिल’चे आयोजन केले होते. म्हणजे हा व्हिडियो खऱ्या रुग्णाचा नाही. ती केवळ मॉक ड्रिल होती.

मूळ बातमी येथे पाहा – पुणे मिरर
सोशल मीडियावर या व्हिडियोद्वारे भीती पसरत असल्याचे पाहून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, डेक्कन भागातील मॉक ड्रिलचा हा व्हिडियो आहे. यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हा डेमो घेण्यात आला होता. परंतु, या व्हिडियोला चुकीच्या दाव्यासह शेयर करण्यात आहे.
23 जून रोजीच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, पुण्यात आज डेक्कन परिसरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडीयोचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी!
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे महानगरपालिकेने घेतलेल्या मॉक ड्रिलचा व्हिडियो खऱ्या कोविड रुग्णाचा म्हणून शेयर केला जात आहे. सदरील डेमो व्हिडियोला चुकीच्या दाव्यासह शेयर करून भीती पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Title:पुण्यातील रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडल्याचा तो व्हिडियो ‘मॉक ड्रिल’ आहे. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
