
इस्कॉन या संस्थेने रशियामध्ये श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एका जलदगती रेल्वेचे इंजिन श्रीकृष्णाच्या चित्राने सजविले, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत एका रेल्वेचा फोटोदेखील देण्यात आला आहे. यामध्ये श्रीकृष्णलीलेतील एक प्रसंग रेल्वे इंजिनवर चितारण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. असे जर भारतात झाले असते तर किती मोठ वाद उफाळला असता, अशी उपरोधात्मक टीकासुद्धा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुक पोस्टमध्ये एका रेल्वेचा फोटो दिलेला आहे. या रेल्वेच्या इंजिनवर श्रीकृष्णलीलेचा एक प्रसंग रंगविण्यात आलेला आहे. कॅप्शनमध्ये हिंदीतून लिहिले की, जगभर कृष्णाचे अनुयायी वाढविण्यासाठी इस्कॉनने रुसमध्ये एका रेल्वे इंजिनवर श्रीकृष्ण साकारला आहे. हेच इंजिन जर भारतात असते तर संसदेपासून संपूर्ण देशात वाद उफळला असता.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोची सत्यता प्रस्थापित करण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून या रेल्वेशी साम्य असणाऱ्या अनेक रेल्वेंचे फोटो समोर आले. प्रामुख्याने खालील फोटो लक्ष वेधतो.

हा फोटो साउदर्न स्टेट कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ट्रांसपोर्ट रेफ्रिजरेशन, एयर रेफ्रिजरेशन, रेल एयर कंडिशनिंग अशा सुविधा पुरवणारी ही आधुनिक आणि आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी मूळची ऑस्ट्रेलियातील आहे. कंपनीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. म्हणजे हा फोटो रशियामधील नाही. आता फेसबुक आणि वर दिलेला फोटो यांची तुलना करू.

दोन्ही फोटोंच्या तुलनेतून हे सिद्ध होते की, मूळ फोटोला एडिट करून श्रीकृष्णाचा फोटो रेल्वेवर लावण्यात आला. मूळ फोटोमध्ये निळ्या रंगाच्या इंजिनवर मेट्रो असे लिहिलेले आहे. फोटोशॉपद्वारे त्याजागी श्रीकृष्णाचा फोटो लावण्यात आला आहे.
रशियामध्ये इस्कॉन आहे का?
इस्कॉनचे रशियामध्ये विविध सेंटर आहेत. मॉस्कोमध्ये जग्गनाथ मंदिर आणि श्री श्री राधा माधव हे सेंटर आहे. परंतु, इस्कॉनने कृष्णाचे फोटो रेल्वे इंजिनवर लावलेले नाहीत. तो फोटो खोटा आहे.
निष्कर्ष
रेल्वेवर कृष्णाचे चित्र असलेला फोटो खोटा आहे. एडिट करून ऑस्ट्रेलियन कंपनीच्या रेल्वेवर असे चित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्या आहे.

Title:FACT CHECK: रशियामध्ये इस्कॉनतर्फे रेल्वेवर कृष्णाचे चित्र लावण्यात आले आहे का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
