
कॅन्सरला समूळ नष्ट करणारे औषध किंवा उपचारपद्धती निर्माण करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर्स संशोधन करीत आहेत. दरम्यान, कॅन्सरवर अशा तऱ्हेचा उपाय मिळाल्याच्या वावड्या उठत असतात.
सध्या सोशल मीडियावर एक बातमी फिरत आहे की, केवळ 48 तासांमध्ये कोणत्याही स्टेजच्या कॅन्सरचा नायनाट करणारे औषध सापडले आहे. ते औषध म्हणजे द्राक्षाच्या बियांचा रस. परिवर्तनाचा सामना या संकेतस्थळाने ही बातमी दिली आहे. याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – परिवर्तनाचा सामना । अर्काइव्ह
फेसबुकवर ही बातमी आणि अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहेत.
इतरही अनेक फेसबुक पेजवरून सदरील माहिती वजा बातमी शेयर करण्यात आली आहे.

तथ्य पडताळणी
“परिवर्तानाचा सामना”च्या बातमीमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनाचा आधार घेत दावा करण्यात आला आहे की, कॅन्सरच्या रुग्णाला द्राक्षांचा बियांचा रस प्यायला दिल्यास 48 तासांमध्ये सकारात्मक परिणाम दिसू लागतात. तसेच बातमीत डॉ. हर्डिन बी. जॉन्सनी यांचा दाखल देत म्हटले आहे की, द्राक्षाच्या बियांपासून निघणारा रस इतक्या वेगाने असर करतो की, 48 तासांमध्येच त्याचे परिणाम समोर येतात.

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम कॅनिफोर्निया विद्यापीठातील संशोधन आणि डॉ. हार्डिन बी जॉन्सनी यांचा शोध घेतला. त्यातून आढळले की, University of California at Berkeley मध्ये डॉ. हार्डिन बी. जोन्स नावाचे प्राध्यापक होते. तेथे ते मेडिकल फिजिक्स व सोयकोलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच विभागातील डॉनर प्रयोगशाळेचे ते सहायक संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.
विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यांच्याबद्दल अधिक येथे वाचा – डॉ. जोन्स । अर्काइव्ह
विशष म्हणजे डॉ. जोन्स यांचे 1978 सालीच निधन झाले आहे. त्याची न्यूयॉर्क टाईम्सने दिलेली बातमी येथे वाचा – न्यूयॉर्क टाईम्स । अर्काइव्ह
डॉ. जोन्स यांनी कॅन्सरवर संशोधन केलेले आहे. परंतु, त्यांनी द्राक्षाच्या बियांच्या रसाचे लाभ किंवा तत्सम संशोधन केलेले नाही. उलट त्यांच्याच केमोथेरपीच्या नुकसानाविषयीच्या एका दाव्यावर अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता. डॉ. जोन्स यांचा तो दावा खोटादेखील ठरला आहे. त्याबद्दल अधिक सविस्तर येथे वाचा – स्नोप्स । करेक्टिव्ह
दरम्यान, University of California at Berkeley च्या संकेतस्थळावरदेखील सदरील बातमी दावा केल्याप्रमाणे कोणतेही संशोधन उपलब्ध नाही.
बातमीत पुढे म्हटले आहे की, डॉ. हार्डिन जोन्स यांच्या शोधानुसार द्राक्षाच्या बियांचा अर्क 78 टक्के कॅन्सर पेशी मुळापासून निष्क्रिय करतात. तेदेखील कोणत्याही साईड इफेक्टशिवाय. तसेच डॉक्टरांच्या च्या सल्ल्यानुसार याचे सेवन केल्यास केवळ 48 तासांतच कॅन्सर नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते.

याविषयी मग आम्ही मग अधिक सखोल तपास केला असता बीबीसीवर 31 डिसेंबर 2008 रोजी प्रसिद्ध झालेली एक बातमी आढळून आली. त्यात क्लिनिकल कॅन्सर रिसर्चच्या रिपोर्टचा दाखला देत द्राक्षाच्या बियांच्या अर्कामुळे केवळ 24 तासांमध्ये कॅन्सरपेशीं नष्ट होत असल्याचे म्हटले आहे. परंतु, यामध्ये हेदेखील स्पष्ट नमूद केले आहे की, हे केवळ प्राथमिक संशोधन आहे. त्यामुळे द्राक्ष खाऊन कॅन्सर बरा करण्याचा दावा करता येणार नाही.
मूळ बातमी येथे वाचा – बीबीसी । अर्काइव्ह

हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ केन्टकीच्या Toxicology and Cancer Biology विभागातील Xianglin Shi यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले होते. अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित हे संशोधन येथे वाचा – क्लिनिकल कॅन्सर रिसर्च । अर्काइव्ह
सायन्स डेलीच्या बातमीत ते स्वतः म्हणतात की, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी लोकांनी लगेच द्राक्ष किंवा द्राक्षाच्या बिया खाव्यात असा सल्ला देता येता येणार नाही. त्यासाठी हे संशोधन पुरेसे नाही. केमोथेरपीला पर्याय म्हणून याकडे सध्या तरी पाहता येणार नाही.

मूळ बातमी येथे वाचा – सायन्स डेली । अर्काइव्ह
तसेच 130 वर्षांपासून कॅन्सर संबंधी संशोधन करणारी जगातील सर्वात मोठी खासगी संस्था मेमोरियल स्लोन केटरिंक कॅन्सर सेंटरच्या संकेतस्थळावरदेखील म्हटले आहे की, द्राक्षाच्या बियांचा कॅन्सर बरा करण्यासाठी किती लाभ होतो यासंबंधी फारसे संशोधन झालेले नाही. तसेच स्तनाचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांमध्ये रिडियोथेरेपीनंतर द्राक्षाच्या अर्काचा कोणताही विशेष परिणाम दिसून आला नाही.

मूळ लेख येथे वाचा – एमसीकेसीसी । अर्काइव्ह
निष्कर्ष
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, परिवर्तानाचा सामनाने दिलेल्या बातमीप्रमाणे 48 तासांत कॅन्सरचा नायनाट करणारा उपचार सापडलेला नाही. तसेच बातमीत नमूद संशोधकाचे 41 वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. द्राक्षांसंबंधी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने संशोधन केलेले नसून ते युनिव्हिर्सिटी ऑफ केन्टकीने केले आहे. द्राक्षाच्या बियांमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म जरी असले तरी 48 तासांमध्ये कॅन्सर बरा करण्याचा दावा चूकीचा आहे.

Title:द्राक्षाच्या बियांनी 48 तासांमध्ये बरा होतो का कॅन्सर? जाणून घ्या सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
