आज बँकांसमोरील मोठे आव्हान म्हणजे थकलेले कर्ज. बँकांच्या ढासळत्या परिस्थितीसाठी कर्ज बुडवेगिरी हे एक मोठे कारण आहे. अनेक बडे उद्योगपती बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेले. त्यामुळे कर्ज थकविणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. अशाच एका कर्जबुडव्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे.

दावा केला जात आहे की, इंदोरमधील एका आमदाराने स्टेट बँकेचे 65 कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी मग त्याच्या पदाची कोणतीही तमा न बाळगता त्याला घरातून अक्षरशः दोन्ही हात-पाय धरून बाहेर काढले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसुबकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमध्ये MP तक नावाच्या चॅनेलवरील बातमीचा व्हिडियो शेयर करण्यात आला आहे. बातमीनुसार, इंदोरमधील सत्यानारायण राठी नावाच्या एका भाजपनेत्याने स्टेट बँकेचे 65 कोटी रुपयांचे कर्ज थकविले. ते वसूल करण्यासाठी प्रशासनाने राठी यांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने राठी यांच्या घराचा ताबा मिळवला. यावेळी हुज्जत घालणाऱ्या राठींना पोलिसांनी दोन्ही हाता-पायाला धरून घराबाहेर नेले.

युजरने हा व्हिडियो शेयर करताना म्हटले की, इंदोरच्या बीजेपी आमदाराने स्टेट बँकेचे 65 करोड थकवले होते. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टातून त्याच्या प्रॉपर्टी जप्तीची कारवाई केली. आमदाराला कसा उचलला बघा.

मग सत्यनारायण राठी खरंच आमदार आहे का? ही कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने केंद्र सरकारतर्फे करण्यात आली का?

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम MP तक चॅनेलवरील मूळ बातमीचा व्हिडियो शोधला. तो तुम्ही खाली पाहू शकता. बातमीमध्ये कुठेही सत्यनारायण राठी हे आमदार असल्याचा उल्लेख नाही. केवळ भाजप नेते असेच त्यांचे वर्णन करण्यात आले आहे. ते जर आमदार किंवा माजी आमदार असते तर बातमीत नक्कीच ही गोष्ट सांगण्यात आली असती. तसेच बातमीत ही कारवाई हायकोर्टाच्या आदेशाने करण्यात आल्याचे म्हटल आहे.

https://www.youtube.com/watch?v=u3EOqn7LqVg

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सत्यनारायण राठी इंदोरमधील उद्योगपती आहेत. स्टेट बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे त्यांचे घर जप्त करण्यासाठी पोलीस प्रशासनासह बँक कर्मचारी गेले होते. कारवाईमध्ये आडकाठी करीत राठी व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी राठी यांना उचलून घराबाहेर काढले. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. बातमीमध्येसुद्धा सत्यनारायण राठी आमदार असल्याचा उल्लेख नाही.

https://twitter.com/ani/status/1167906509981806593

ANI Newsअर्काइव्ह

पत्रिका आणि अमर उजाला दैनिकांच्या बातमीनुसार, इंदोरमधील उत्कर्ष इंडस्ट्रीचे संचालक सत्यनारायण राठी यांनी स्टेट बँकेचे कोट्यवधीचे कर्ज थकविले होते. नोटीस बजावूनही राठी यांनी कर्ज न फेडल्यामुळे बँकेने मध्य प्रदेश हायकोर्टाकडे दाद मागितली. हाय कोर्टाने राठी यांच्या घरासह इतर संपती व मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार महसूल अधिकारी व पोलिस प्रशासन राठी यांच्या कैलाश पार्क कॉलनीतील घरी गेले.

तेथे सत्यनारायण व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना घर जप्त करण्यास विरोध केला. बऱ्याचवेळ हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी सत्यनारायण उचलून बाहेर काढले. त्यांच्यासह पोलिसांनी मुलगा नकुंज, नातेवाईक सिद्धार्थ राठी, दिव्य राठी आणि तरुण चुघ यांनासुद्धा ताब्यात घेतले. बातमीत कुठेही सत्यनारायण राठी आमदार असल्याचे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – पत्रिकाअर्काइव्हअमर उजालाअर्काइव्ह

सत्यनारायण राठी यांचा भाजपशी संबंध काय?

दैनिक भास्करच्या 30 जून 2018 रोजीच्या बातमीनुसार,  सत्यनारायण राठी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्यविरोधात गेल्यावर्षी अटक वॉरंट निघाले होते. त्यामुळे तो पाच दिवस फरार होता. 30 जून रोजी तो इंदोरच्या भाजप कार्यालयात पोहचला. अटक होण्यापासून वाचवण्यासाठी त्याने भाजपच्या नेत्यांना विणवणी करीत गोंधळ घातला. खासदार नंदकुमार सिंह चौहान, कृष्णमुरारी मोघे, आमदार रमेश मेंदोला व इंदोर भाजप अध्यक्ष कैलाश शर्मा यांनी त्याची समजुत काढली. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. राठीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्याला अटक करण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर । अर्काइव्ह

सत्यनारायण राठी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईत सहभागी मुख्य पोलीस अधीक्षक (CSP) ज्योती उमठ यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, सत्यनारायण राठी आमदार नाहीत. तसेच ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही तर, मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आदेशानुरूप करण्यात आली.

निष्कर्ष

स्टेट बँकेचे कोट्यवधींचे कर्ज बुडवल्यामुळे इंदोर शहरातील उद्योपती सत्यनारायण राठी यांना पोलिसांनी उचलून घराबाहेर काढत जप्तीची कारवाई केली. सत्यनारायण राठी हे भाजपचे आमदार नाहीत. इंदोर पोलिसांनीसुद्धा सांगितले की, राठी आमदार नाहीत. तसेच, सुप्रीम कोर्ट नाही तर, मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावे खोटे ठरतात.

Avatar

Title:FACT CHECK: कर्ज बुडविले म्हणून इंदोरमधील भाजप आमदाराला पोलिसांनी घरातून उचलले का?

Fact Check By: Agastya Deokar

Result: False