इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या कारवाईचे उत्तर म्हणून इराणने 8 जानेवारी रोजी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. सोशल मीडियावर या हल्ल्याचा म्हणून एक कथित व्हिडियो शेयर होत आहे. यामध्ये अँटी-मिसाईल यंत्रणा क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करताना दिसते. सोबत दावा करण्यात आला की, अमेरिकेने अशा प्रकारे इराणचा हल्ला परतवून लावला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून त्याचे फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये जमिनीवरील क्षेपणास्त्र-विरोधी यंत्रणा हवेतून येणाऱ्या मिसाईलचा वेध घेत त्या नष्ट करताना दिसते. सोबतच्या मेसेजमध्ये म्हटले की, अमेरिकने इराणच्या मिसाईल कशा हवेतच हाणून पाडल्या बघा. याच्यामुळे इराण अमेरिकेच्या बेसवर हल्ला करू शकला नाही. अशी यंत्रणा भारताकड पण पाहिजे...

फेसबुकवरदेखील हा व्हिडियो खूप शेयर होत आहे.

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील की-फ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, चीनमधील वाईबो या सोशल मीडिया वेबसाईटवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात आला आहे.

यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्चमध्ये युट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडियो आढळला. 

https://www.youtube.com/watch?v=O4g3z8EJVfI

या व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो ARMA-3 नावाच्या गेममधील फुटेज आहे. याचा अर्थ की, हा व्हिडियो खऱ्याखुऱ्या युद्धाचा किंवा हल्ल्याचा नाही. हा तर एका व्हिडियो गेममधील चित्रण आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा व्हिडियो युट्यूबवर उपलब्ध आहे. गेमधील BGM-109 Tomahawk नावाची ही संरक्षण यंत्रणा आहे.

ARMA-3 नावाच्या या गेममधील हा व्हिडियो सर्वप्रथम 24 जून 2019 रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. एखाद्या प्लेयरने गेम रेकॉर्डकरून तो अपलोड केला आहे. गेममधील अतिवास्तव ग्राफिक्समुळे हा व्हिडियो खरा असल्याचा अनेकांना गैरसमज होतो.

गेल्यावर्षीदेखील विविध देशांच्या नावे हा व्हिडियो सोशल मीडियावर पसरला होता. गाझा पट्टी येथे इस्रायलची अँटी मिसाईल यंत्रणा म्हणून हाच व्हिडियो शेयर केला जात होता. तेव्हा एएफपी वृत्तसंस्थेने हा व्हिडियो गेम तयार करणाऱ्या बोहिमिया इंटरअ‍ॅक्टिव्ह कंपनीशी संपर्क साधला होता.

कंपनीने तेव्हा स्पष्ट केले होते की, अँटी-मिसाईलचा हा व्हिडियो ARMA-3 नावाच्या गेममधील आहे. तो खरा नाही. या गेममध्ये प्लेयर्स त्यांच्या मर्जीप्रमाणे दृश्य निर्माण करू शकतात.

मूळ बातमी येथे वाचा – AFP Portuguese

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, सोशल मीडियावर शेयर होत असलेला अँटी-मिसाईलचा व्हिडियो खरा नाही. तो ARMA-3 नावाच्या गेमधील फुटेज आहे. यामध्ये अमेरिकेने इराणच्या मिसाईल पाडलेल्या नाहीत. त्यामुळे व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा ठरतो.

Avatar

Title:ही अमेरिकेची अँटी मिसाईल यंत्रणा नाही. हा ARMA-3 नावाच्या गेमचा व्हिडियो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False