
अनेक मोबाईल वापरकर्त्यांना 20 जून रोजी सकाळी 10 वाजता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट मेसेज आला होता. अचानक आलेल्या या मेसेजवरून अनेक वावड्या उठल्या. उलटसुलट चर्चांना उधाण आले.
त्यात भर म्हणून एक मेसेज व्हायरल होऊ लागला की, मध्यरात्री पृथ्वीच्या जवळून वैश्विक किरणे जाणार असल्यामुळे सर्वांना आपापले मोबाईल दूर ठेवावे. सोबत नासा, बीबीसी आणि सीएनएन असा संस्थांचा हवाला देऊन हा संदेश इतरांना शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज खोटा आहे. नासा आणि बीबीसीने अशी कोणती माहिती दिलेली नाही.
काय दावा आहे ?
व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले होते की, “आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत, तुमचे सेल्युलर फोन,टॅब्लेट इ. बंद करण्याचे सुनिश्चित करा आणि ते तुमच्या शरीरापासून दूर ठेवा. सीएनएन टेलिव्हिजनने ही माहिती दिली आहे. कृपया आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगा. आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत, कारण आपला ग्रह खूप जास्त रेडिएशन उत्सर्जित करेल. वैश्विक किरण पृथ्वीच्या जवळून जातील. त्यामुळे कृपया तुमचे मोबाईल बंद करा. तुमचे डिव्हाइस तुमच्या शरीराजवळ सोडू नका, यामुळे तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते. Google, NASA आणि BBC बातम्या पहा. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व लोकांना हा संदेश पाठवा. तुम्ही लाखो लोकांचे जीव वाचवाल.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर केल्यावर कळाले की, वैश्विक किरणांविषयक हा फेक मेसेज 2008 पासून पसरविला जात आहे. 2010 साली घाना या देशामध्ये बीबीसीच्या नावाने असाच एक मेसेज व्हायरल झाला होता. त्यामध्ये म्हटले होते की, रात्री 12.30 ते पहाटे 3.30 दरम्यान पृथ्वीवर वैश्विक किरणे धडकतील. त्यामुळे नागरिकांना या काळात फोन बंद ठेवावेत अन्यथा भूकंपाचा धोका होऊ शकतो.
हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर बीबीसीने खुलासा केला होता की, त्यांनी असा कोणताही इशारा अथवा मेसेज जारी केलेला नाही. ही केवळ एक अफवा असून मेसेजमध्ये केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले होते.

मूळ पोस्ट – बीबीसी
तसेच नासाने जारी केलेल्या कोणत्याही बातम्यांमध्ये व्हायरल मेसेज संबंधिक अशी माहिती आढळून आली नाही. नासाने त्यांच्या वेबसाइटवर वैश्विक किरण संबंधिक माहिती दिलेली आहे.
वैश्विक किरण हे उच्च-ऊर्जेचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनसारखे अणु आहेत, जे प्रकाशाच्या वेगाने आकाशगंगेत फिरतात आणि आपल्या सौरमालेपर्यंत पोहोचतात.
वैश्विक किरण काय आहे ?
नासाच्या वेबसाईटनुसार जेव्हा वैश्विक किरण मूलतः सापडले तेव्हा शास्त्रज्ञांनी त्यांना अवकाशात सूर्यप्रकाशासारखे पसरणारे किरण समजले आणि गैरसमज झाला. प्रत्यक्षात वैश्विक किरण सुपरनोव्हा स्फोटांसारख्या दूरच्या आणि प्राचीन आंतरतारकीय घटनांद्वारे उत्सर्जित होणारे छोटे अणु कण असतात.
याशिवाय, नासाने अमेरिकेतील मिनेसोटा येथे दिसणार्या वैश्विक किरणांवर दर 15 सेकंदांनी छायाचित्रे अपडेट करणारी वेबसाइट विकसित केली आहे.
नासा आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) यांसारख्या संस्थांकडून वैश्विक किरणांबद्दल सतत चेतावणी दिली जाते.
वैश्विक किरणांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला थेट धोका नाही. जवळ मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्यानेही धोका वाढत नाही, असे या वेबसाईटवरील माहितीमध्ये सांगितलेले आहे.

मूळ पोस्ट – नासा
अवकाशातील होणाऱ्या किरणोत्सर्गापासून आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत का ?
नासाने स्पष्टीकरण दिले आहे की, रेडिएशन सुरक्षित असले तरी ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही. ग्रहाभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि पृथ्वीचे वातावरण सौर आणि वैश्विक किरणोत्सर्गाच्या संपूर्ण प्रभावापासून ग्रहावरील जीवनाचे संरक्षण करते. यासारख्या अनेक प्रकाशनांद्वारे पुराव्यांनुसार, अंतराळातील अंतराळवीरांवर वैश्विक किरणांच्या प्रभावाचा अभ्यास चालू आहे.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा खोटा आहे. वैश्विक किरणांचा धोका टाळण्यासाठी रात्री मोबाईल बंद करून ठेवण्याची चेतावणी निव्वळ अफवा आहे. नासा, बीबीसी किंवा सीएनएनने असा कोणताही मेसेज जारी केलेला नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:वैश्विक किरणांमुळे मोबाईल दूर ठेवण्याची अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
