
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात वेगवेगळे कयास बांधणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. यामध्ये हत्येच्या कटासंदर्भात सोनिया गांधी आणि एकुणच काँग्रेस पक्षासंदर्भात गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. राजीव गांधीच्या हत्येवेळी सोनिया गांधीचे त्यांच्यासोबत नसणे किंवा त्यावेळी एकही काँग्रेस नेता हल्ल्यात बळी न पडणे याकडे पोस्टमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्यांची पडताळणी केली.
पोस्टमध्ये तीन दावे करण्यात आले आहे. ते असे-
1. राजीव गांधी यांनी संपूर्ण आयुष्यात 181 रॅली संबोधित केल्या. त्यापैकी 180 रॅलीमध्ये त्यांच्यासोबत सोनिया गांधी उपस्थित होत्या. मात्र ज्या सभेत राजीव यांची हत्या झाली त्या शेवटच्या 181 व्या रॅलीच्या वेळीच सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या.
2. मानवी बॉम्बहल्ल्यात राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त 14 लोकांचा मृत्यू झाला. परंतु या 14 पैकी कोणीच काँग्रेसचे नव्हते. ते सगळे सामान्य लोक होते.
3. राजीव गांधी यांच्या शेवटच्या सभेला काँग्रेसचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता.
या तिन्ही दाव्यांची एक-एक करून सत्यता तपासून बघू
तथ्य पडताळणी
तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा 1989 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. जनता दलाचे व्ही. पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले. परंतु, 16 महिन्यातच हे सरकार कोसळले आणि 1991 साली पुन्हा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. यादरम्यान प्रचार करत असताना 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तमिळनाडू येथील श्रीपेरुम्बुदूरमध्ये मानवीबॉम्ब हल्ल्यात हत्या करण्यात आली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम (एलटीटीई) या संघटनेचा यामागे हात असल्याचे तपासात समोर आले.
दावा क्र. 1: सोनिया गांधी राजीव यांच्या 181 पैकी 180 सभांना उपस्थित होत्या
राजीव गांधी नेमक्या किती राजकीय सभा घेतल्या याचा कोणताही निश्चित आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी 181 सभा घेतल्या असे ठामपणे सांगणे शक्य नाही. तसेच सोनिया गांधी कायमच त्यांच्यासोबत राहायच्या हा दावादेखील शंकास्पद आहे.
एबीपी न्यूज वृत्तवाहिनीने राजीव गांधीचे शेवटचे 30 तास कसे होते यावर शो केला होता. त्यानुसार, राजीव गांधी 20 मे रोजी सायंकाळी पाच वाजता दिल्लीहून भुवनेश्वरला (ओडिशा) गेले. यावेळी त्यांनी स्वतः विमान चालविले. तेव्हा त्यांच्यासोबत सोनिया गांधी नव्हत्या. रात्री 8.30 वाजता ते भुवनेश्वरला पोहचले. येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर ते तेथे मुक्कामी होते.
‘इंडिया बियॉन्ड सिक्स्टीः इन मेमोरियम, चौधरी रणबीर सिंग’ या पुस्तकातील माहितीनुसार, राजीव गांधी यांनी 21 मे रोजी सकाळी ओडिशामधील भद्रक, अंगुल, परलाखेमुंडी आणि गुनपूर येथे सभा घेतल्या. त्यानंतर दुपारी ते हेलिकॉप्टरने आंधप्रदेशमधील श्रीकाकुलम येथे गेले. येथील विझियनग्राम आणि विशाखापट्टणममध्ये विशाल रॅलीत ते सहभागी झाले. त्यानंतर ते सायंकाळी विशाखापट्टणम येथून चेन्नईला गेले. तेथून दोन तासांच्या कारप्रवासानंतर ते त्यादिवशीच्या शेवटच्या सभेसाठी श्रीपेरुम्बुदूरला पोहोचले. राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी दिल्लीला होत्या.

मूळ पुस्तक येथे वाचा – गुगल बुक्स
याचाच अर्थ की, राजीव यांच्या ओडिशा, आंध्रप्रदेश येथील सभांनासुद्धा सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. 181 हा जर आकडा सत्य मानला तर सोनिया गांधी एकापेक्षा जास्त सभांना गैरहजर होत्या. तसेच अनेक वेळा राजीव गांधी यांनी सोनिया यांच्याशिवाय राजकीय सभा घेतल्या आहेत. त्यामुळे 181 पैकी 180 सभांना उपस्थित राहण्याचा दावा असत्य ठरतो.
दावा क्र. 2: हल्ल्यात मृतांपैकी एकही काँग्रेस नेता नव्हता
या मानवीबॉम्ब हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह 15 जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, मृतांपैकी किमान तीन जण काँग्रेसचे पदाधिकारी होते. यामध्ये संथनी बेगम (महिला काँग्रेसच्या अध्यक्ष), लता कनन (महिला काँग्रेस कार्यकर्ती) आणि माजी आमदार मुनुस्वामी यांचा समावेश होता. त्यामुळे मृतांमध्ये काँग्रेस नेते नसण्याचा दावा असत्य ठरतो.
मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक (एसपी), दोन पोलीस निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल यांचाही समावेश होता. राजीव गांधी सभेच्या ठिकाणी आल्यावर लगेच कारमधून उतरून स्टेजकडे निघाले होते. त्यांच्या स्वागतासाठी अनेक महिला सज्ज होत्या. यावेळी पोलिसांनी राजीव गांधी यांच्याभोवती सुरक्षाकडे केले. जेव्हा बॉम्बहल्ला झाला तेव्हा राजीव यांच्या आसपास सामान्य कार्यकर्ते आणि पोलिस यांचा गराडा होता. सभेला उपस्थित नेते स्टेजवर उपस्थित होते.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस । अर्काइव्ह
दावा क्र. 3: सभेला कोणीही मोठा काँग्रेस नेते उपस्थित नव्हते
राजीव गांधी यांचा मतदानापूर्वीचा हा शेवटचा प्रचार दौरा होता. विशाखापट्टण येथे विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चेन्नईला जाण्याचा बेत रद्द करून ते विश्रामगृहाकडे परत निघाले होते. परंतु, अर्ध्यावाटेत विमान दुरुस्तीचा निरोप आल्यावर राजीव गांधी त्यांच्या सुरक्षाप्रमुखांनासुद्धा सोबत न घेताच तातडीने चेन्नईला रवाना झाले.
इंडिया टुडेवरील हत्याकांडाविषयीच्या सविस्तर लेखानुसार, सभेला काँग्रेसचे खासदार जी. के मूपनार आणि खासदार जयंती नटराजन उपस्थित होत्या. त्यांनीच सर्वप्रथम राजीव यांचा छिन्नविच्छन्न झालेला मृतदेह ओळखला होता. त्याचबरोबर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभा उमेदवार मार्गाथम् चंद्रशेखर यादेखील यावेळी उपस्थित होत्या. हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचे मोठे नेते या सभेला उपस्थित नव्हते हा दावा असत्य आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
निष्कर्ष
राजीव गांधी यांच्या प्रत्येक सभेला सोनिया गांधी उपस्थित राहत नव्हत्या. तसेच मानवीबॉम्ब हल्ल्यात तीन काँग्रेस कार्यकर्तेदेखील मृत पावले. या सभेला ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदारदेखील उपस्थित होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून या पोस्टमध्ये करण्यात आलेले तीन्ही दावे असत्य असल्याचे निष्पण्ण झाले.

Title:FACT CHECK: राजीव गांधी यांच्या 181 पैकी 180 सभांना सोनिया गांधी उपस्थित होत्या का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
