
पाकिस्तानी क्रिकेटपटुंची इंग्रजी भाषेवरून सोशल मीडियावर तशी खिल्ली उडविली जाते. सामना झाल्यावर पत्रकार परिषद किंवा बक्षीस वितरणप्रसंगी पाकिस्तानी खेळाडू चुकीचे इंग्लिश बोलतानाचे व्हिडियोदेखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यात भर म्हणजे चुकीच्या इंग्रजीसाठी आता उमर अकमलची चांगलीच टर उडविली जात आहे. ईदनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, त्याने God Bless You लिहिण्याऐवजी God Blast You असे लिहिले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये उमर अकमलच्या ट्विटचा स्क्रीनशॉट दिला आहे. त्यामध्ये “I is a happy Eid Mubarak god blast you all” असा चुकीचा इंग्रजी मजकूर लिहिलेला दिसतो. सोबत गुलाबी रंगाची शेरवानी घातलेला अकमलचा फोटोसुद्धा आहे. स्क्रीनशॉटनुसार त्याने हे ट्विट 5 जून 2019 रोजी केले होते.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून उमर अकमलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 9 ऑक्टोबर 2015 रोजी केलेले ट्विट आढळले. यामध्ये त्याचा गुलाबी शेरवानीतील फोटो स्क्रीनशॉटमधील फोटोशी साम्य असणारा आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये त्याने कॅप्शन म्हणून केवळ जुम्मा मुबारक असे लिहिलेले आहे. म्हणजे हा फोटो ईदचा नाही. तसेच यामध्ये दावा केल्याप्रमाणे चुकीचा इंग्रजी संदेशसुद्धा नाही.
उमर अकमलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तपासणी केली असता त्याने 5 जून 2019 रोजी कोणतेही ट्विट केले नसल्याचे दिसून येते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उमर अकमलचे अधिकृत ट्विटर हँडल @Umar96Akmal असे आहे. पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटमधील ट्विटर हँडल @UK96 असे आहे. हे अकाउंट ट्विटवरून काढून टाकण्यात आलेले आहे. मूळ ट्विट आणि स्क्रीनशॉटची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.

याचाच अर्थ की, फोटोशॉप्ड करून उमर अकमलच्या नावे खोटे ट्विट शेयर केले जात आहे. त्याच्याविषयी असे घडल्याचे ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील उमर अकमलबद्दल खोटी माहिती पसरविण्यात आली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये अकमलचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. यानंतर त्याने स्वतः ट्विट करून तो ठीक असल्याची माहिती दिली होती.
निष्कर्ष
उमर अकमलच्या नावे एडिट केलेले ट्विट पसरविले जात आहे. त्याने ईदच्या शुभेच्छा देताना God Blast You असे ट्विट केलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Title:पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलने ईदच्या शुभेच्छा देताना God Blast You असे ट्विट केले का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
