
प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्या बालपणाविषयक एक करुणादायी मेसेज व्हायरल होत आहे. लहानपणी मुंबई-बंगळुरू रेल्वेतून त्या विनातिकिट प्रवास करत असताना एका मायाळू प्राध्यापिकेने त्यांची मदत करत त्यांना शिकण्यासाठी मदत केली, असे या व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज बनावट आहे. खरं तर सुधा मुर्ती यांनी लिहिलेल्या एका लघुकथेमध्ये बदल करून हा मेसेज फिरवला जात आहे.
काय आहे दावा?
व्हायरल मेसेजचा सारांश असा: मुंबई-बंगळुरू रेल्वेने जात असताना टीसीने एका 13-14 वर्षांच्या मुलीला विनातिकिट प्रवास करताना पकडले. प्रा. उषा भट्टाचार्या यांनी हे पाहून चित्रा नावाच्या या मुलीला मदत केली. त्यांनी तिच्या तिकिटाचे भरून तिला बंगळुरूमध्ये एका एनजीओमध्ये भरती केले. मग त्या दिल्लीला स्थलांतरित झाल्या आणि त्यांचा चित्रासोबत संपर्क तुटला. मग 20 वर्षांनी प्रा. उषा अमेरिकेला गेल्या असता तेथे हॉटेलमध्ये त्यांचे कोणी तरी बिल आधीच भरले होते. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक महिला पतीसोबत उभी होती. त्यांनी तिला बिल का भरले म्हणून विचारल्यावर त्या महिलेने त्यांना मुंबई-बंगळुरू रेल्वेतील प्रसंगाची आठवण करून दिली. ही महिला म्हणजे ती मुलगी चित्रा होती. आता या मुलीचे नाव सुधा मुर्ती होते आणि तिच्यासोबत तिचा पती नारायण मुर्ती होते.

मूळ पोस्ट – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
सुधा मुर्ती यांच्यासोबत खरंच असे काही घडले का याचा कीवर्ड सर्चद्वारे शोध घेतला. त्यातून स्पीकिंग ट्री नामक ब्लॉग पेजवर या मेसेजशी साम्य असणारी ‘बॉम्बे टू बँगलोर’ ही गोष्ट आढळली.
या ब्लॉगमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, हा उतारा सुधा मुर्ती यांच्या कथासंग्रहातील आहे. इंग्रजी उताऱ्यामध्ये प्रा. उषा भट्टाचार्या यांचा उल्लेख नाही. उलट सुधा मुर्ती यांनी प्रथमपुरुषी कथनामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे.

मूळ ब्लॉग – स्पीकिंग ट्री
हा धागा पकडून आम्ही संपूर्ण कथा कुठे मिळेल याचा शोध घेतला. सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या The Day I Stopped Drinking Milk नावाच्या संग्रहातमध्ये ‘बॉम्बे टू बँगलोर’ नावाची ही कथा असल्याचे सापडले.
पेंग्विन प्रकाशनाने 2012 साली हा संग्रह प्रकाशित केला होता. यामध्ये सुधा मुर्ती यांनी त्यांच्या जीवनातील विविध अनुभव आणि प्रसंगाचे वर्णन केलेले आहे.
‘बॉम्बे टू बँगलोर’ नावाच्या प्रकरणामध्ये सुधा मुर्ती यांनी त्या गुलबर्गा येथून बंगळुरुला रेल्वेने जात असतानाचा अनुभव लिहिलेला आहे. मूळ कथानकामध्ये सुधा मुर्ती यांना चित्रा नावाची मुलगी विनातिकिट प्रवास करताना भेटली होती. मुर्ती यांनी या मुलीची बंगळुरूमध्ये एका संस्थेमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तिचे शिक्षण सुरू असताना मुर्ती या मुलीच्या संपर्कात राहायच्या. या मुलीने शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत नोकरी स्वीकारली. तेव्हासुद्धा चित्रा मुर्ती यांच्या संपर्कात होती. चित्राला जेव्हा कळाले की, सुधा मुर्ती अमेरिकेला तिच्याच शहरात येणार तेव्हा ती त्यांना भेटायला गेली होती. तिने मुर्ती यांचे हॉटेल बिल चुकते केले होते. यावेळी चित्रासोबत तिचा होणारा नवरा जॉनसुद्धा असतो.

संपूर्ण कथा तुम्ही येथे वाचू शकता.
पूर्ण कथा वाचल्यावर कळते की, चित्रा ही मुलगी सुधा मुर्ती नाहीत. तसेच चित्राच्या नवऱ्याचे नाव जॉन आहे, नारायण मुर्ती नाही.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, सुधा मुर्ती यांनी लिहिलेल्या कथेमध्ये बदल करून व्हायरल मेसेजमधील मजकूर शेअर केला जात आहे. विनातिकिट प्रवास करणारी ती मुलगी सुधा मुर्ती नव्हती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सुधा मुर्ती मुंबई-बंगळुरू रेल्वेत विनातिकिट प्रवास करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
