
सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावे एक कात्रण व्हायरल होत आहे. ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली’, असे मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. या कात्रणाच्या सत्य पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय आहे कात्रणात?
‘कोरोना ने तोडी मेरी धर्म में आस्था – मोहन भागवत’ अशा मथळ्याखाली एका हिंदी बातमीचे कात्रण सोशल मीडियावर शेयर केले जात आहे. मोहन भागवतांच्या फोटोसह बातमीत म्हटले की, कोरोनामुळे कळाले की, आपल्या देशाला धार्मिक स्थळांऐवजी रुग्णालये व शाळा आणि पुजारांऐवजी डॉक्टर-वैज्ञानिक अधिक गरजेचे आहेत.

तथ्य पडताळणी
मोहन भागवत यांनी कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी झाल्याचे वक्तव्य केले का? याचा शोध घेतला असता असी एकही बातमी आढळली नाही. भागवतांनी जर असे वक्तव्य केले असते तरी याची नक्कीच मोठी बातमी झाली असती. परंतु, तसे काही दिसून आले नाही.
सदरील कात्रणाचे नीट निरीक्षण केले तर लक्षात येते की, वृत्तपत्रातील प्रमाणित बातमीचे नियम कात्रणातील वृत्तात पाळण्यात आलेले नाही. उदाहरणार्थ, बातमी तारीख नाही (डेटलाईन), शीर्षकाच्या शब्दांमध्ये एकसमान अंतर नाही. मोहन भागवत असे कोणत्या कार्यक्रमात म्हणाले, त्याचे निमित्त काय तसेच शीर्षक वगळता बातमीत कुठेही मोहन भागवत यांचे नाव नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी ट्विट करून हे कात्रण बनावट असल्याचे सांगितले. मोहन भागवत यांनी असे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निष्कर्ष
यातून हे स्पष्ट होते की, वृत्तपत्राचे हे कात्रण बनावट असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Title:कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी असे मोहन भागवत म्हणाले नाही; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
