FAKE ALERT: रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली का? वाचा सत्य

False राजकीय | Political

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी नियुक्ती झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर पसरविली जात आहे. एका भारतीयाला एवढा मोठा सन्मान मिळत असल्याने सहाजिकच नेटीझन्समधून राजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, भारत सरकारवर टीकादेखील केली जात आहे. पण खरंच रघुराम राजन यांची अशी नियुक्ती झाली का? चला सत्य जाणून घेऊया.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये युजरने रघुराम राजन यांचा हातात पुष्पगुच्छ असलेला एक फोटो शेयर करून लिहिले की, भारतीयांनी गमावला एक कोहिनूर. रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्त. आता काय म्हणाल?

रघुराम राजन आंतरराष्ट्रीयस्तरावर आघाडीचे अर्थ तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते सध्या शिकागो विद्यापीठाच्या बुथ स्कूल ऑफ बिझनेमध्ये वित्त विभागाचे प्राध्यापक आहेत. मग जर ते बँक ऑफ इंग्लडचे गव्हर्नर झाले असतील तर ही खरंच खूप मोठी बाब आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर मात्र वेगळेच तथ्य समोर येते. हा फोटो रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतरचा नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 23वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतानाचा आहे. इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांनी 5 सप्टेंबर 2013 रोजी हा फोटो काढला होता.

मूळ छायाचित्र येथे पाहा – इंडियन एक्सप्रेस

मग बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नर पदाचे काय?

बिझनेस स्टँडर्डने 29 एप्रिल रोजी दिलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ इंग्लंडच्या पुढील गव्हर्नरचा शोध सुरू झाला असून, या पदासाठी एकुण सहा संभाव्य उमेदवारांच्या यादीत रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे. ही नियुक्ती ऑक्टोबर महिन्यात केली जाणार आहे.

मूळ बातमी येथे वाचा – बिझनेस स्डँडर्डअर्काइव्ह

इंग्लंडच्या अर्थ खात्याचे चान्सलर फिलिप हॅमंड यांनी 24 एप्रिल रोजी ब्रिटिश संसदेतील कनिष्ठ सभागृहाच्या कोषागार समितीला (House of Commons Treasury Committee) पत्र लिहून कळविले की, बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्ने यांचा कार्यकाळ 31 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात येत असून नव्या गव्हर्नरचा शोध आजपासून सुरू करण्यात आला आहे. या पदासाठी योग्य उमेदवार शोधण्याचे काम सफायर पार्टनर या कंपनीला देण्यात आले आहे. 5 जूनपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असून, नवे गव्हर्नर 1 फेब्रुवारी 2020 रोजी पदभार स्वीकारतील.

मूळ पत्र ब्रिटिश संसदेच्या वेबसाईटवर वाचा – UK Parliament

फायनान्शियल टाईम्स दैनिकाने या पदासाठी संभाव्य उमेदवारांची सहा नावे दिली आहेत. रघुराम राजन यांच्यासह इंग्लंडच्या आर्थिक कर्तव्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँन्ड्रयू बेली, बँक ऑफ इंग्लंडमधील वित्त धोरणाचे डेप्यूटी गव्हर्नर बेन ब्रॉडबेंट, आर्थिक स्थिरतेचे डेप्युटी गव्हर्नर जॉन कनलिफ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या संचालिका मिनोशे शफिक, सॅन्टँडर यूकेच्या प्रमुख श्रिती वडेरा यांच्या नावांचा समावेश आहे. गार्डियन दैनिकानेदेखील काही संभाव्य उमेदवारांची यादी दिली आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, बँक ऑफ इंग्लंडच्या नव्या गव्हर्नरचा केवळ शोध सुरू झाला असून रघुराम राजन यांचे नाव चर्चेत आहे. त्यांची नियुक्ती झालेली नाही.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील याचसुमारास रघुराम राजन हे बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदाचे संभाव्य उमेदवार असल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती. अगदी शशी थरूरदेखील या अफवेला बळी पडले होते. त्यांनी खोटी बातमी ट्विट करून रघुराम राजन यांच्या नियुक्तीची प्रशंसा केली होती.

रघुराम राजन यांनी स्वतःदेखील गेल्या वर्षी बँक ऑफ इंग्लंडचे गव्‍‌र्हनर होण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, शिकागो विद्यापीठात मला चांगली नोकरी आहे. मी व्यावसायिक बँकर नसून, संशोधक आहे. माझ्या सध्याच्या कामात मी संतुष्ट आहे. मी कुठेही नोकरी किंवा पदासाठी अर्ज केलेला नाही आणि करणारही नाही.

मूळ बातमी येथे वाचा – बिझनेस स्टँडर्डअर्काइव्ह

निष्कर्ष

बँक ऑफ इंग्लंडच्या नव्या गव्हर्नरचा शोध सुरू झाला आहे. या पदाच्या संभाव्य उमेदवारामध्ये रघुराम राजन यांचे नाव घेतले जात आहे. परंतु, त्यांची तशी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील त्यांच्या नियुक्तीच्या पोस्ट असत्य आहेत.

Avatar

Title:FAKE ALERT: रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली का? वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False