
महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू असले तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर राज्यातील विविध शहरांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी चेतावणी देणारे मेसेज व्हायरल होत आहेत.
औरंगाबाद आणि नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने मेसेजद्वारे जनतेमध्ये भीती घातली जात आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये जीवनावश्यक सेवादेखील बंद राहणार आहेत. तसेच या काळात काय करू नये याचीदेखील माहिती दिली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे कळाले.
काय आहे मेसेजमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
नाशिक किंवा औरंगाबादमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सूचना दिल्या का याचा सर्वप्रथम शोध घेतला.
तेव्हा लोकमतच्या नाशिक आवृत्तीमध्ये 2 जुलै रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळली. यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नावे खोटा संदेश व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर ‘नाशिक कलेक्टरकडून सूचना’ असा जो मेसेज फिरत आहे तो खोटा असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. असे खोटे संदेश पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही त्यांनी इशारा दिला.
नाशिकच्या माहिती कार्यालयानेदेखील अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही बातमी शेयर करीत या मेसेजचे खंडन केले आहे.
औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनीदेखील औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या नावे फिरणारा संदेश निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. समाजमाध्यमांवरील मेसेजचे खंडन करताना त्यांनी माहिती दिली की, अशा आशयाचा मेसेज सध्या समाज माध्यमावर फिरत आहेत. याबाबत स्पष्ट करतो की अशा प्रकारच्या सूचना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नाहीत आणि अशा प्रकारचे वृत्त जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांनी काढलेले नाही. व्हायरल मेसेज फेक आहे. तो मेसेज शेयर करू नये.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, औरंगाबाद आणि नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनाविषयी खोटे संदेश पसरविले जात आहे. दोन्ही शहरांतील प्रशासनांनी या मेसेजवर विश्वास न ठेवणयाचे आवाहन केले आहे.

Title:कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
