कोरोना लसीचा कॉल आल्यावर फोन हॅक होण्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

False Social

मागील काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी एका मेसेज द्वारे लोकांना आवाहन केले की कोरोनाची लसीबद्दल कॉल आला तर 1 किंवा 2 नंबरचे बटण दाबू नये. अन्यथा फोन हॅक होतो आणि आपल्या बँक खात्या विषयची सगळी माहिती कॉल करणाऱ्यांकडे जाते.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. महाराष्ट्र पोलिसांनी असा कोणताही मेसेज जारी केलेला नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, तुम्हाला कोरोना ची लस घेतली का हे विचारणारा कॉल येईल घेतली असेल तर 1 दाबा नसेल घेतली तर 2 दाबा असं ऑप्शन सांगितलं जाईल पण तुम्ही एक आकडा दाबा किंवा दोन तुमचा मोबाईल hang होऊन तुमचे सगळे बँक डिटेल कॉल करणाऱ्या समाजकन्टकाकडे जाणारच त्यामुळे असा कोणताही कॉल आला तर लगेच कट करा हा मेसेज सर्वत्र पाठवा. – महाराष्ट्र पोलीस.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम असा कोणता इशारा पोलिसांनी जारी केला असता तर त्याविषयी बातम्या आल्या असतील. परंतु, माध्यामांमध्ये अशी कोणतीच बातमी आढळली नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, यापूर्वी 2021 मध्येदेखील असाच एक मेसेज व्हायरल झाला होता. ज्यामध्ये लिहिले होते की, “912250041117 या क्रमांकावरुन आलेल्या कॉलमध्ये म्हटले जाते की, ‘लसीकरण केले गेले असल्यास 1 दाबा.’ आपण जर 1 नंबर दाबले तर तो फोन हॅक होतो.”

हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले होते.

कॉल आल्यावर फोन हॅक होतो का ?

पुणे सायबर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मिनल पाटील यांनी सांगितले की, “व्हायरल दावा भ्रामक आहे. कॉल आल्यावर किंवा 1, 2 नंबरचे ऑप्शन दाबल्यावर फोन हॅक होत नाही किंवा बँक डिटेल कॉल करणाऱ्यांकडे जात नाही. ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हे कॉल किंवा मेसेज द्वारे आपल्याला अज्ञात लिंकवर क्लिक करायला आणि OTP शेअर करायला सांगतात. तसेच कॉल आल्यावर किंवा 1, 2 नंबरचे ऑप्शन दाबल्यावर फोन हॅक होतो, असा असा कोणताही मेसेज महाराष्ट्र पोलिसांनी जारी केलेला नाही.”

कोरोना लसीकरणासाठी सरकार कडून कॉल येतो का ?

कोरोना हेल्पलाईन नंबर 1075 वर विचारणा केल्यावर तेथील प्रवक्त्याने स्पष्ट केले की, “कोरोना लसीकरणाची विचारपूस करण्यासाठी सरकारकडून कॉल केले जात नाही.”

कोरोना लसीकरणाविषयी अधिकृत माहिती

आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याणच्या https://www.cowin.gov.in/ या पोर्टलवर आपण लसीकरणासाठी नोंदणी करू शकतात. 

कोरोना आणि लसीकरणाविषयी अधिक महितीसाठी आपण सेतू अॅप किंवा 1075 या क्रमांकावर कॉल करू शकता.

मोबाइल हॅक होऊ नये म्हणून काय करावे?

1. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
2. स्वत:ची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये.
3. कोणतेही अ‍ॅप अधिकृत प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करावे.
4. ई-मेल, सोशल मीडिया अकाउंट आणि फोनवरील पासवर्ड दर महिन्याने बदलावे.
5. पासवर्ड आणि ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये. 

तसेच आपण ऑनलाइन फसवणूक आणि गुन्हापासून वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोच्या ‘माय फॅक्ट ट्री’ या वेबसाईटला भेट देऊन ‘मीडिया लिटरेसी’ अभियानात सहभागी होऊ शकतात. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असून महाराष्ट्र पोलिसांनी जारी केलेला नाही. कॉलवर 1 किंवा 2 नंबरच ऑप्शन दाबल्यावर फोन हॅक होत नाही. चुकीच्या दाव्यासह मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कोरोना लसीचा कॉल आल्यावर फोन हॅक होण्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False