FACT CHECK: औरंगाबादमध्ये पोलिसांनी पकडले म्हणून चालकाने स्वतःची दुचाकी पेटवली का?

False सामाजिक

मोटर वाहन कायद्यातील नवीन तरतुदींची अंमलबजावणी केल्यानंतर चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या वाढीव दंडावरून हे वाद होत असल्याचे दिसून येते. दिल्लीमध्ये तर दंड लावल्यामुळे एका युवकाने स्वतःची दुचाकीच पेटवून दिली होती. अशाच प्रकारची घटना औरंगाबादमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर दुचाकी जळत असल्याचा व्हिडियो शेयर करून म्हटले जात आहे की, पोलिसांनी गाडी पकडली म्हणून मालकाने दुचाकी पेटवून दिली. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

23 सप्टेंबर 2019 रोजी शेयर करण्याता आलेल्या 30 सेंकादाच्या व्हिडियो क्लिपमध्ये एका दुचाकीला आग लागलेली दिसते. दुचाकी रस्त्यावर खाली पडलेली आहे. आजूबाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. व्हिडियोसोबत लिहिलेले आहे की, औरंगाबाद येथील बाबा पेट्रोल पंपवर पोलिसांनी गाडी पकडली तर गाडी मालकाने गाडीच जाळली. आजचीच घटना

तथ्य पडताळणी

औरंगाबादमध्ये खरंच असे काही घडले का याची माहिती घेण्यासाठी स्थानिक पत्रकारांकडे विचारणा केली. त्यातून कळाले की, ही घटना औरंगाबादमधील पंचवटी चौकात घडली होती. याला कर्णपुरा चौकदेखील म्हणतात. बाबा पेट्रोल पंपापासून ही जागा थोड्या अंतरावर आहे. सकाळ वृत्तपत्रामध्ये 19 सप्टेंबर रोजी दुचाकी जळाल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता. यामध्ये पोलिसांनी पकडल्यामुळे चालकाने गाडी पेटवली, असे म्हटलेले नाही. पत्रकारांनीसुद्धा असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. 

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मग पदमपुरा अग्नीशामक दलाशी संपर्क केला. फायरमन लक्षण कोल्हे यांनी माहिती दिली की, ‘18 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी एक वाजता आम्हाला दुचाकीने पेट घेतल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही लगेच घटनास्थळी पोहचलो आणि आग विझवली. तेथे विचारणा केली असता कळाले की, गाडी स्लीप होऊन पडली आणि अचानक आग लागली.’ या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर केले जात असलेल्या दाव्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी ते असत्य असल्याचे सांगितले.

वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवटी/कर्णपुरा चौक येतो. फॅक्ट क्रेसेंडोने या ठाण्याशी संपर्क केला असता कळाले की, या घटनेची तेथे नोंदच नाही. गाडी चालकाने या घटनेची कोणतीही तक्रार अथवा नोंद ठाण्यात दिलेली नाही, अशी पोलिसांनी माहिती दिली.

तसेच औरंगाबाद वाहतूक विभागाच्या छावणी चौकीतर्फे माहिती देण्यात आली की, 18 सप्टेंबर रोजी दुपारी दुचाकीने भररस्यात पेट घेतल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्नीशामक दलाने आग विझवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये कोणालाही इज झाली नाही. सोशल मीडियावरील दावा पूर्णतः चुकीचा आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडियो नांदेडमधील म्हणूनही फिरवला जात आहे. परंतु, हेदेखील खोटं आहे.

निष्कर्ष

सदरील व्हिडियोमधील दुचाकी जळण्याची घटना 18 सप्टेंबर 2019 रोजी औरंगाबाद येथील पंचवटी/कर्णपूरा चौकामध्ये घडली होती. या दुचाकीने अचानक पेट घेतला होता. पोलिसांनी पडकले म्हणून चालकाने दुचाकी जाळली नव्हती. वृत्तपत्रांचे छायाचित्रकार घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनीसुद्धा सोशल मीडियावरील दावा खोटा असल्याचे सांगितले.

Avatar

Title:FACT CHECK: औरंगाबादमध्ये पोलिसांनी पकडले म्हणून चालकाने स्वतःची दुचाकी पेटवली का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False