सोशल मीडियावर सध्या राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडियो’ या वाक्याची खूपच चर्चा आहे. आपल्या जाहीर भाषणांतून व्हिडियो पुराव्यांद्वारे भाजपची पोलखोल करण्याची त्यांची शैली नेटीझन्सना प्रचंड आवडत आहे. म्हणून लोकदेखील त्यांना काही व्हिडियो सुचवत आहेत. असाच एक व्हिडियो सध्या राज ठाकरेंनी आपल्या सभेत दाखवावा म्हणून फिरवला जात आहे.

या व्हिडियोमध्ये एका व्यक्तीने मतदान केंद्राचा ताबा घेतलेला असून, मतदारांच्या बाजूला उभा राहून तो त्यांच्याकडून मतदान करून घेत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, ही व्यक्ती म्हणजे भाजपचे नेते अनिल उपाध्याय आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये लिहिले की, भाजपचे अनिल उपाध्याय यांचे कारनामे बघा. पुढचा व्हिडियो हाच झळकला पाहिजे स्क्रीनवरती. ए लाव रे तो व्हिडियो.

तथ्य पडताळणी

एकुण 2 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक पांढऱ्या कपड्यामधील व्यक्ती मतदान केंद्रात मतदारांसोबत उभा राहून त्यांच्याकडून मतदान करून घेत आहे. नियमाप्रमाणे मतदाराशिवाय कोणालाही ईव्हीएम मशीनजवळ सोबत राहता येत नाही. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणारी ही घटना नेमकी कुठली आहे हे आम्ही शोधले.

व्हिडियोमधील आवाज खराब (Distort) करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडियोच्या सत्यतेबाबत शंका घेण्यास वाव आहे. व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यास 50व्या सेंकदानंतर भींतीवर लावलेल्या सूचना दिसतात.

NO SMOKING आणि 2nd POLLING असे इंग्रजीतून लिहिलेले आहे. सोबतच बंगाली भाषेतून त्याचे भाषांतर दिलेले आहे. म्हणजे हा व्हिडियो महाराष्ट्रातील नाही. तो पश्चिम बंगालमधील असावा असा अंदाज बांधता येतो. त्यानुसार मग बंगालमध्ये अशाप्रकारे मतदान केंद्राचा ताबा (Booth Capturing) घेतल्याची घटना घटली का याचा इंटरनेटवर शोध घेतला.

आम्हाला एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेची खाली दिलेली बातमी आढळली. यामध्ये पश्चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उदेमदवार देवश्री चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी (18 एप्रिल) प. बंगालमधील रायगंज येथे हिंसाचार उसळला होता.

मूळ बातमी येथे वाचा – एएनआयअर्काइव्ह

जागरण या हिंदी दैनिकाच्या युट्यूब चॅनेलवरील बातमीनुसार, रायगंज येथील सीपीएमचे उमेदवार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर इस्लामपूर भागात दगडफेक झाली होती. रायगंजापासून 100 किमी अंतरावरील इस्लामपूर येथे मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचे वृत्त कळाल्यावर ते तेथे जात होते. तेव्हा त्यांच्या कारवर दगडफेक करण्याता आली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – दैनिक जागरण

म्हणजे प. बंगालमधील रायगंज मतदारसंघातील इस्लामपूर येथे मतदान केंद्राचा ताबा घेतल्याची घटना घडली असावी. याबाबत आणखी शोध घेतला असता, युट्यूबवर रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनेने 18 एप्रिल रोजी अपलोड केलेला व्हिडियो आढळला.

हा व्हिडियो आणि फेसबुकवरील व्हिडियो सारखाच आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. रिपब्लिक टीव्हीच्या बातमीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने इस्लामपूर येथील मतदान केंद्राचा ताबा घेतला होता.

https://www.youtube.com/watch?v=D9HNMmxLi0Q&t=139s

ई-टीव्ही भारत या वृत्तस्थळाच्या बंगाली भाषेतील बातमीनुसार व्हिडियोमध्ये दिसणारा पांढऱ्या कपड्यातील व्यक्तीचे नाव हमिजिऊद्दीन असे असून, तो तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की आई आणि मुलीला मतदानासाठी तो घेऊन गेला होता. केंद्राच्या पीठासीन अधिकाऱ्याची तब्येत ठीक नसल्याने त्याने कुटुंबाचे मतदान करवून घेतले.

आयएफसीएन मानांकित वेबसाईट बुम लाईव्हनेदेखील या व्यक्तिच्या नावाची स्वतंत्र पुष्टी केली आहे.

यावरून हे सिद्ध होते की, सदरील व्हिडियो प. बंगालमधील इस्लामपूर येथील असून यामध्ये दिसणारा व्यक्ती तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

मग भाजपचा नेता अनिल उपाध्याय कोण आहे?

भाजपशी संबंधित अनिल उपाध्यायचा शोध घेतला असता, गेल्या काही महिन्यांपासून अनिल उपाध्याय नावाच्या व्यक्तीविषयी सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आल्याचे समोर आले. मध्यंतरी मध्यप्रदेशात एका पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करतानाच व्हिडियो व्हायरल झाला होता. मारहाण करणारा काँग्रेसचा आमदार अनिल उपाध्याय असल्याचा दावा करण्यात आला. नंतर सत्य बाहेर आले की, ही घटना उत्तर प्रदेशची असून पोलिसाला मारहाण करणारा व्यक्ती मेरठचा भाजप आमदार मनीष पंवर आहे. (संदर्भ - दैनिक भास्कर)

महाराष्ट्रामध्ये भाजपशी संबंधित अनिल उपाध्याय याच्याविषयी आम्हाला डीएनए वेबसाईटवर 31 ऑक्टोबर 2018 रोजीची एक बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, भाजपचे अनिल उपाध्याय आणि शिवसेनेचे राजेश सातपुते यांनी एकमेकांविषयी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दोघांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – डीएनए

निष्कर्ष

मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचा व्हिडियो पश्चिम बंगालमधील असून, त्यात दिसणारी व्यक्ती भाजपचे अनिल उपाध्याय नसून, तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अनिल उपाध्याय यांच्या नावे पसरविल्या जाणाऱ्या पोस्ट असत्य आहेत.

Avatar

Title:FACT CHECK: भाजपच्या अनिल उपाध्याय यांनी खरंच मतदान केंद्राचा ताबा घेतला होता का?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False