
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून पारंपारिक दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलची टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, दावा केला जात आहे की, उपग्रहाने 5 एप्रिल 2020 रोजी टिपलेल ते भारताचे छायाचित्र आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली असता हा दावा खोटा आढळला.
काय आहे पोस्टमध्ये?
भारताचा नकाशा असलेला कृष्णधवल फोटो शेयर करून म्हटले की, रविवारी रात्री लोकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिल्यानंतर उपग्रहातून भारताचे असे छायाचित्र टिपण्यात आले.

तथ्य पडताळणी
सदरील छायाचित्र नेमके कधी काढण्यात आले याचा शोध घेण्यासाठी त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) 12 नोव्हेंबर 2015 रोजी केलेले एक ट्विट आढळले. या ट्विटमध्ये सदरील फोटो शेयर करण्यात आला असून, सोबत म्हटले की, भारतातील दिवाळीच्या रात्रीचा हा फोटो नाही. तो जूना असून, फेक दाव्यासह व्हायरल होत आहे.
याचा अर्थ हा फोटो विविध दाव्यांसह वर्षानुवर्षे शेयर केला जात आहे. अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, यूएस डिफेन्स मेट्रोरोलॉजिकल सॅटेलाइट प्रोग्रामच्या (डीएमएसपी) उपग्रहांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वैज्ञानिक क्रिस एल्व्हिज यांनी लोकसंख्येच्या वाढीवर प्रकाश टाकण्यासाठी 2003 साली ही प्रतिमा तयार केली होती, असे नासाच्या अर्थ ऑब्जर्व्हेर्टरीने म्हटले आहे.

पर्यावरणीय बदलांची माहिती देणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर ईनव्हारमेंटल इन्फॉरमेशनच्या (NOAA/Archive) वेबसाईटवर सदरील इमेज हाय रेज्युलेशनमध्ये उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, 5 एप्रिल 2020 रोजी उपग्रहाद्वारे घेण्यात आलेले हे छायाचित्र नाही. ही 2003 साली नासाने लोकसंख्यावाढ दर्शविण्यासाठी तयार केलेली प्रतिमा आहे. त्याचा रविवारी झालेल्या दिवे लावण्याच्या उत्सवाशी काही संबंध नाही. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा असत्य आहे.

Title:पाच एप्रिलच्या रात्री उपग्रहाने भारताचे हे छायाचित्र घेतले नव्हते. वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
