
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, केरळमधील वायनाड येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी झेंडे हाती घेऊन हैदोस घातला. राहुल गांधी यंदा वायनाड येथून लोकसभा लढणार असे जाहीर झाल्यानंतर केरळमधील हा मतदारसंघ राष्ट्रीयस्तरावर चर्चेत आला. तेव्हापासून वायनाडबाबत विविध दावे करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
वरील पोस्टमध्ये 24 सेकंदाचा व्हिडियो शेयर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शन दिले की, “पाकिस्तानी झेंडा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांचा वायनाड मध्ये हैदोस…आता बोला…काँग्रेसी म्हणून घ्यायला लाज वाटते का नाही अजून?” ही पोस्ट आतापर्यंत सुमारे 500 वेळा शेयर करण्यात आलेली आहे.
न्यूज-18 केरळ नावाच्या वृत्तवाहिनीचा हा व्हिडियो आहे. यामध्ये काही कार्यकर्ते राहुल गांधींचा फोटो घेऊन मल्याळम भाषेत घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच व्हिडियोमध्ये हिरवे झेंडेदेखील दिसतात. हे झेंडे पाकिस्तानचे झेंडे असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
तथ्य पडताळणी
फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम या व्हिडियोमध्ये काय म्हटले आहे हे तपासले. आमच्या मल्याळम फॅक्ट चेकरने केलेल्या अनुवादाप्रमाणे व्हिडियोमध्ये न्यूज अँकर म्हणतोय की, आतापर्यंत कोणाच्याही ध्यानीमनी नसणाऱ्या वायनाड या केरळमधील गावाची काल रात्री बारानंतर सगळीकडे चर्चा केली जात आहे. राहुल गांधीमुळे येथील अल्पसंख्याक जनतेचे यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (यूडीएफ) लाभ मिळेल, असे भाकित वर्तविण्यात येत आहे. व्हिडियोमध्ये कार्यकर्ते – राहुल गांधी देशाची इज्जत राखणार, राहुल गांधींचे वायनाडमध्ये स्वागत – अशा घोषणा देत आहेत.
व्हिडियोमध्ये कुठेही पाकिस्तानी झेंड्याचा उल्लेख नाही.
व्हिडियोतील झेंड्याची पाकिस्तानच्या झेंड्याशी तुलना करून पाहू. पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये हिरवा आणि पांढरा रंग आहे. तसेच मध्यभागी चांद-सितारा आहे. व्हिडियोतील झेंडा पूर्णतः हिरवा असून त्यामध्ये चांद-सितारा डावीकडे वरच्या बाजूस आहे. यावरून हे सिद्ध होते की, हा झेंडा पाकिस्तानचा नाही.
मग हे हिरवे झेंडे कोणाचे आहेत?
केरळमध्ये यूडीएफ ही राजकीय पक्षांची आघाडी आहे. यामध्ये काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (एम), केरळ काँग्रेस (जेकब) आणि रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अशा पक्षांचा समावेश आहे.
यापैकी इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) या पक्षाचा झेंडा हिरवा आहे. हिरव्या झेंड्याच्या वर डाव्या बाजूस पांढऱ्या रंगात एक अर्धचंद्र आणि तारा आहे. व्हिडियोतील झेंडा मुस्लिम लीगच्या झेंड्याशी मिळताजुळता आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता.
मुस्लिम लीग हा केरळमधील अधिकृत पक्ष असून निवडणूक आयोगाची या पक्षाला अधिकृत मान्यता आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन्ही पक्ष यूडीएफ आघाडीचे घटक असल्याने राहुल गांधी वायनाडमधून उभे राहणार हे जाहीर झाल्यावर लीगच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यामुळे हे लीगचे हिरवे झेंडे दिसत आहेत.
भारतीय निवडणूक आयोग । अर्काइव्ह
निष्कर्ष
व्हिडियोमध्ये दिसणारा हिरवा झेंडा पाकिस्तानचा नसून, इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाचा आहे. त्यामुळे वायनाडमध्ये पाकिस्तानी झेंडा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांचा हैदोस घातल्याची पोस्ट खोटी आहे.

Title:तथ्य पडताळणीः वायनाडमध्ये पाकिस्तानी झेंडा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांचा हैदोस?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
