दोन हजराच्या नोटा अद्याप चलनातून बाद नाही; वाचा आरबीआयचा निर्णय नेमके काय सांगतो

Explainer

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2000 रुपयाच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने शुक्रवारी (19 मे) एक परिपत्रक काढून नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.  

या निर्णयामुळे सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्म अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पुन्हा एकदा नोटबंदी तर जाहीर झाली नाही ना अशी शंका उपस्थित केली. तसेच आता दोन हजार रुपयांची नोटेवर बंदी घालण्यात आली, असे भ्रामक मेसेज व्हायरल होऊ लागले.

या लेखात आपण आरबीआयच्या निर्णयविषयी सखोल माहिती घेऊन याविषयीच्या शंका दूर करुया.

आरबीआयचा निर्णय काय आहे?

आरबीआयने  दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा किंवा बदली करून घेण्यासाठी 23 मेपासून 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. 23 मे पासून आपण बँकेत जाऊन आपल्याकडील दोन हजारांच्या नोटा आपल्या खात्यात जमा करू शकता किंवा त्याबदल्यात इतर किंमतीच्या (500, 200, 100, इत्यादी.) नोटा घेऊ शकता.

दोन हजाराची नोटेवर बंदी आली आहे का?

नाही. या नोटेवर अद्याप बंदी आलेली नाही. आरबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी दोन हजाराची नोट चलनात राहणार आहे. म्हणजे तुम्ही या नोटेद्वारे व्यवहार करू शकता. तुमच्याकडील दोन हजाराच्या नोटा अद्याप वैध आहेत.

तरीदेखील आरबीआयच्या सूचनेनसार, 30 सप्टेंबरच्या आता सर्व दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करणे आवश्यक आहे.

आपल्याकडील दोन हजाराच्या नोटा बँकेत कशा जमा करायच्या?

आपल्याकडील दोन हजाराच्य नोटा 23 मेपासून बँकेत जमा करता येणार आहे. त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही तुमच्या खात्यात त्या जमा करू शकता किंवा त्या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या किंमतीच्या नोटा घेऊ शकता.

बँक खात्यात जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. आपण कितीही नोटा आपल्या खात्यात जमा करू शकता. परंतु, नोटा बदली करण्यासाठी एका वेळी दोन हजारांच्या केवळ दहा नोटा (20 हजार रुपये) बदलता येणार आहे. याहून अधिक रक्कम बदली करून घेण्यासाठी एका पेक्षा जास्त वेळेस बँकेत ट्रान्जॅक्शन करावे लागेल.

नोटा बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे.

बँकमध्ये नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर काय?आरबीआयच्या मार्गदर्शकतत्वानुसार, कोणतेही विशेष कारण नसताना बँक आपल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. परंतु असे झाल्यास आपण वरिष्ठ अधिकारी किंवा शाखेत तक्रार करू शकता किंवा cms.rbi.org.in. या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता.

Avatar

Title:दोन हजराच्या नोटा अद्याप चलनातून बाद नाही; वाचा आरबीआयचा निर्णय नेमके काय सांगतो

Written By: Sagar Rawate 

Result: Explainer