
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते कार्यालयात बसून टीव्हीवर बेरोजगार युवकांना पोलिसांनी केलेली मारहाण पाहताना दिसतात. एवढेच नाही तर, हे पाहून ते हसतदेखील आहेत.
हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री चव्हाण यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली.
आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कार्यालयात बसून टीव्ही आंदोलकांना पोलिस मारत असल्याची बातमी पाहत आहेत. दावा केला जात आहे आहे की, “बेरोजगार युवक नोकरी मागण्यासाठी आंदोलन करीत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री चौहान पाहत होते आणि वरून हसतसुद्धा होते.”
तथ्य पडताळणी
या व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर संबंधीत व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ 27 जून 2021 रोजी शेअर करण्यात आला होता.
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री चौहान टीव्हीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘‘मन की बात’’ कार्यक्रम पाहत होते. नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडची लस घेण्याचे आवाहन केले होते.
म्हणजेच वरील व्हिडिओमध्ये मन की बात कार्यक्रमाच्या जागी युवकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एडिट करून टाकण्यात आला आहे.
मूळ व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओ यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.
विशेष म्हणजे तरुणांना मारहाणीचा व्हिडिओ गेल्या वर्षीचा म्हणजे 2021 मधील आहे. झी न्युज मध्य प्रदेश छत्तीसगढ चॅनेलच्या बातमीनुसार, सरकारी नोकरभरतीच्या मागणीसाठी या तरुणांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा निघाला असता पोलिसांनी त्यांच्या लाठीचार्ज केला होता.
नुकतेच (9 ऑक्टोबर) भोपाळमध्ये राष्ट्रीय शिक्षित युवा संघातर्फे पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला थांबविण्यासाठी पोलिसांनी युवकांना मारहाण केली होती. उच्च शिक्षा विभागचे जवळपास 5500 जागा रिक्त असून आत्तापर्यंत पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिली गेलेली नसल्यामुळे बेरोजगार युवक आक्रमक झाले होते.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. शिवराज सिंह चौहान बेरोजगार युवकांना मारहाण होताना पाहून हसत नव्हते. मूळ व्हिडिओत ते ‘मन की बात’ कार्यक्रम पाहत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा युवकांना होणारी मारहाण पाहतानाचा व्हिडिओ खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
