प्रियंका गांधी यांच्यावर लहान मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शिवराळ घोषणा शिकवून त्या देण्यास उद्युक्त करण्याची प्रखर टीका केली जात आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडियो क्लिपमध्ये काही लहान मुले प्रियंका गांधींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींना शिव्या देणाऱ्या घोषणा देताना दिसतात. यावरून नेटीझन्समध्ये प्रचंड मत-मतांतरे व्यक्त केली जात आहे.

फेसबुकअर्काइव्ह

11 सेकंदाच्या या व्हिडियो क्लिपमध्ये प्रियंका गांधी काही लहान मुलांसोबत उभ्या आहेत. कॅमेऱ्यामध्ये न दिसणारा एक व्यक्ती “चौकीदार” अशी घोषणा देतो आणि त्या पाठोपाठ ही लहान मुले “चोर है” असा नारा लावतात. त्यानंतर तो व्यक्ती “नीम का पत्ता कडवा है” असे म्हणतो आणि ही मुले लगेच “मोदी साला *** है” म्हणतात. हे ऐकताच प्रियंका गांधी तोंडावर हात ठेवतात आणि ही क्लिप संपते.

क्लिपवर लिहिले की, लहान मुलांना काँग्रेस पक्ष कोणती भाषा शिकवत आहे? मोदींच्या द्वेषापोटी या मुलांना तरी वाईट शिकवण देऊ नका. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

या संदर्भात जेव्हा आम्ही इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा ट्विटरवर अभिजीत मजुमदार, स्मृती इराणी यासह अनेकांनीवरील क्लिप शेयर केल्याचे आढळले. फेसबुकवरदेखील विविध दाव्यांसह ही क्लिप शेयर करण्यात आली आहे. एका फेसबुक युजरने याच घटनेचा 28 सेंकदाचा व्हिडियो शेयर केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

फेसबुक

यामध्ये लहान मुले जेव्हा मोदींविरोधात शिवराळ नारे देतात तेव्हा प्रियंका गांधी त्यांना लगेच थांबवतात. त्यांना समजावून सांगतात की, ये वाला नहीं. ये वाला अच्छा नहीं लगेगा. अच्छे बच्चेवाले.. ठीक है (हा नारा देऊ नका. हा चांगला नाही. चांगल्या मुलांसारख्या घोषणा द्या).

असे सांगितल्यावर मुलं मग “राहुल गांधी जिंदाबाद” अशा घोषणा देऊ लागतात. त्यानंतर प्रियंका गांधी तेथून निघून जातात.

प्रियंका गांधी यांच्यावर टीका करणारा 11 सेंकदाची क्लिप आणि त्याच घटनेचा 28 सेंकदाचा व्हिडियो यांची तुलना तुम्ही खाली पाहू शकता.

https://youtu.be/PhjvD4tOqWs

स्मती इराणी यांनी ट्विट करून शेयर केलेल्या 11 सेंकदाची क्लिपला उत्तर देताना काँग्रेस पक्षाचे समन्वयक सरल पटेल यांनी मोठ्या लांबीची क्लिप ट्विट केली आणि लिहिले की, ‘असे एडिट केलेले अर्धवट व्हिडियो शेयर करणे थांबवा. मुलांनी शिव्या दिल्यावर प्रियंका गांधी यांनी लगेच त्यांना थांबवले आणि चांगल्या मुलांसारखे होण्यास सांगितले.’

https://twitter.com/SaralPatel/status/1123457322335051780

अर्काइव्ह

निष्कर्ष

फेसबुकवर व्हायरल असलेली 11 सेंकदाची क्लिप मूळ 28 सेंकदाच्या व्हिडियोमधून एडिट केलेली आहे. चुकीचा अर्थ लावून ती पसरविली जात आहे. लहान मुलांनी पंतप्रधान मोदींविरोधात शिव्या दिल्यावर प्रियंका गांधींनी त्यांना थांबवून तशा घोषणा देण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांनी लहान मुलांना शिवराळ घोषणा देण्यास उद्युक्त केले किंवा काँग्रेस पक्षाने त्यांना तसे शिकवले असा दावा करणे असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: प्रियंका गांधी यांनी लहान मुलांना मोदींविरोधात शिवराळ घोषणा देण्यास उद्युक्त केले का?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False