RSS आणि भाजपविरोधात भारतीय जवानांनी घोषणा दिल्या का? पाहा ‘त्या’ व्हिडियोमागील सत्य

False सामाजिक

भारतीय जवानांच्या गणवेशातील काही तरुण भाजप व आरएसएसविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. ‘भाजप के लालो को, गोली मारो *** को’, ‘आरएसएस के लालों को, गोली मारो *** को’ अशा घोषणा या व्हिडियोमध्ये ऐकू येतात. यावरून सोशल मीडियावर दावा केला जातोय की, सीमेवरील जवानांनासुद्धा कळाले की, देशाचे दुश्मन कोण आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत व्हिडियोसोबत केला जात असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

15 सेकंदाच्या या व्हिडियो क्लिपमध्ये भारतीय जवानांच्या गणवेश घातलेले काही तरुण हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर घोषणाबाजी करीत आहेत. फेसबुकवर हा व्हिडियो शेयर करून दावा करण्यात आला की, भारताचा खरा शत्रू कोण आहे हे सीमेवरील सैनिकांना कळलं पण इथल्या मानसिक गुलाम असलेल्यांना नाही कळलं.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोची क्वालिटी फार खराब आहे. व्हिडियोमध्ये दिसणाऱ्या वॉटरमार्कनुसार हा व्हिडियो टिकटॉक या लोकप्रिय व्हिडियोअ‍ॅपवरून घेतल्याचे स्पष्ट दिसते. परंतु, युजरनेम दिसत नसल्यामुळे टिकटॉक अ‍ॅपवर विविध की-वर्ड्सद्वारे (bjp, rss, goli, maro,) शोध घेतला. त्यातून सचिन धिमान नावाच्या एक युजरने मूळ व्हिडियो शेयर केल्याचे दिसले. हा व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोने युट्यूबवर अपलोड केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

या व्हिडियोमध्ये ‘भाजप के लालो को, गोली मारो *** को’, ‘आरएसएस के लालों को, गोली मारो *** को’ अशा घोषणा दिलेल्या नाहीत.

या व्हिडियोमध्ये हमारी सरकार से मांग है…(inaudible chatter)…देश के गद्दारों को, गोली मारो *** को…जो नहीं हैं साथ में, चुडी पहनलो हाथ में… असे नारे लावण्यात आले आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, मूळ व्हिडियोशी छेडछाड करून भाजप व आरएसएविरोधातील नारे एडिट करून टाकण्यात आले आहेत.

हा व्हिडियो कुठला आहे?

व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर हा व्हिडियो नेमका कुठला असू शकतो याची कल्पना येते.

1. रुग्णवाहिका 

रुग्णवाहिकेवर ‘स्वामी भूमानंद अस्पताल’ असे लिहिले आहे. इंटरनेटवर शोध घेतला असता कळाले की, हरिद्वार येते स्वामी भूमानंद रुग्णालय आहे. 

2. हॉटेल त्रिशुल

व्हडियोमध्ये त्रिशुल नावाची एक उभी पाटी दिसते. असा प्रकारच्या पाट्या सामान्यपणे हॉटेल्सच्या असतात. त्यानुसार सर्च केल्यावर कळाले, की, हरिद्वार येथेच हॉटेल त्रिशूल नावाचे एक हॉटेल आहे. खाली एम्बेड केलेल्या गुगल मॅपमध्ये हॉटेल त्रिशुल पाहू शकता. 

निष्कर्ष

वरील तथ्य पडताळणीतून हे तर सिद्ध होते की, सदरील व्हिडियोमध्ये भाजप आणि आरएसएसविरोधात घोषणाबाजी केलेली नाही. तसेच सैन्याच्या गणवेशातील हे तरुण खरंच सैनिक आहेत का याची पुष्टी होऊ शकलेली नाही. तसेच हा व्हिडियो हरिद्वार येथील असण्याची शक्यता आहे.

Avatar

Title:RSS आणि भाजपविरोधात भारतीय जवानांनी घोषणा दिल्या का? पाहा ‘त्या’ व्हिडियोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False