जगातील सर्वात उंच शिवलिंगाचा म्हणून पसरविला जाणार फोटो श्रीलंकेतील नाही. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, श्रीलंकेत 108 फूट उंच शिवलिंग उभारण्यात आले आहे. हे जगातील सर्वात उंच शिवलिंग असल्याचे म्हटले जात आहे. या शिवलिंगाचे फोटो युजर्स शेयर करीत आहेत. लाल रंगाचे हे विशाल शिवलिंग खरंच जगातील सर्वात उंच किंवा श्रीलंकेतील आहे का? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. म्हणून फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथ पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

फोटो आणि पोस्टमधील दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज आणि कीवर्डने सर्च केले. त्यातून युट्यूबवरील काही व्हिडियोज सापडले. ते तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोच्या शीर्षकात म्हटले की, हैदराबाद येथील सर्वात उंच शिवलिंग. व्हिडियोतील शिवलिंग आणि फेसबुक पोस्टमधील शिवलिंग सारखेच आहे.

मग हे हैदराबादचे शिवलिंग आहे का? 

वरील धागा पकडून अधिक शोध घेतला तेव्हा शिवशक्ती शिर्डी साई अनुग्रह महापीठाची माहिती मिळाली. हैदराबादपासून (तेलंगणा) 60-70 किमी अंतरावर असणाऱ्या नागरेड्डी पल्ली येथे हे महापीठ आहे. पीठाच्या अधिकृत वेबसाईटवर या शिवलिंगाचे अनेक फोटो आहेत. या वेबसाईटवरील माहितीनुसार, हे शिवलिंग 63 फूट उंच आहे.

मूळ फोटो येथे पाहा – 63 फूट शिवलिंग

मग हे सर्वात उंच शिवलिंग आहे का?

नाही. सर्वात उंच शिवलिंग केरळच्या थिरुअंतनपुरम येथे आहेत. तेथील माहेश्वर श्री शिवपार्वती मंदिरात हे शिवलिंग उभारण्यात आले आहे. त्यांची उंची 111.2 फूट एवढी आहे. त्याचा इंडिया बूक ऑफ रेकार्ड्समध्ये देशातील सर्वात उंच शिवलिंग म्हणून विक्रम नोंद झाला आहे. 

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस

याआधी हा मान कर्नाटकमधील कोलर जिल्ह्यातील कोटीलिंग मंदिरातील 108 फुटांच्या पिंडीकडे होता. केरळ मधील या विशाल शिवलिंगाचा व्हिडियो पाहा.

निष्कर्ष

श्रीलंकेतील 108 फूट उंच शिवलिंग म्हणून पसरविला जाणारा फोटो मुळात तेलंगणा राज्यातील आहे. नागरेड्डी पल्ली येथील शिवशक्ती शिर्डी साई अनुग्रह महापीठातील हे शिवलिंग 63 फूट उंच आहे. तसेच सर्वाधिक उंच शिवलिंग (111.2 फूट ) केरळमध्ये आहे.

Avatar

Title:जगातील सर्वात उंच शिवलिंगाचा म्हणून पसरविला जाणार फोटो श्रीलंकेतील नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False