भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण इम्तियाज जलील यांच्या पाया पडले का? वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी नेते आणि पक्ष समर्थक सोडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण व्यासपीठावर एका व्यक्तीच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, रविंद्र चव्हाण यांनी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या पाया पडले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती इम्तियाज जलील वा अन्य कोणी एमआयएमचा नेते नसून ते उल्हासनगरचे सिंधी समजातील वासन शहा ‘दरबार’चे छोटू साई आहेत.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये सभामंचावर रविंद्र चव्हाण एका व्यक्तीचे पाया पडताना दिसतात. ती व्यक्ती इम्तियाज जलील यांच्यासारखी दिसत असल्याचे दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात आहे की, “रविंद्र चव्हाण MIM समोर, झुकले, पाया पडले.”

याच दाव्यासह मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम रविंद्र चव्हाण खरंच एमआयएम पक्षाच्या नेत्याचे पाय पकडले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणती बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये सभामंचावर एक बॅनर दिसतो. ज्यामध्ये लिहिले आहे की, ही सभा 7 जानेवारी रोजी उल्हासनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, रविंद्र चव्हाण ज्यांच्या पाडले ते उल्हासनगरमधील सिंधी समाजाच्या वासन शहा ‘दरबार’चे छोटू साई होते.

ठाणे सरकार न्यूज उल्हासनगर नामक चॅनलने व्हायरल क्लिपच्या मोठ्या अवृत्तीचा व्हिडिओ 8 जानेवारी रोजी युट्यूबवर शेअर केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “छोटू साई भाजपच्या व्यासपीठावर आहे” असा उल्लेख केला आहे.

खंडण

खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रवींद्र चव्हाण यांच्या टीमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 11 जानेवारी रोजी तथ्य समोर आणणारे व्हिडिओ शेअर केले.    

ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भाजप आमदार कुमार आयलानी यांनी छोटू साई यांना मंचावर आणले आणि रवींद्र चव्हाण त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.”

पुढे अधिक सर्च केल्यावर भाजप आमदार कुमार आयलानी यांनीदेखील व्हायरल व्हिडिओची दखल घेतल्याचे कळाले.

कुमार आयलानी यांनी 11 जानेवारी रोजी अधिकृत फेसबुक पेजवर एक शेअर केला. ज्यामध्ये ते स्पष्ट करतात की, “व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. मुळात रवींद्र चव्हाण यांनी छोटू साई यांचा आशीर्वाद घेत होते. सिंधी समाजमध्ये उल्हासनगरचे वासन शहा नामक ‘दरबार’  श्रद्धेचे स्थान असून छोटू साई तेथील संत आहेत.”

तसेच छोटू साई उर्फ साई छोटूराम यांनी हाच व्हिडिओ 8 जानेवारी आपल्या इंस्टग्राम पेजवर शेअर केला आहे.


खालील तुलनात्कम फोटो पाहिल्यावर आपल्याला छोटू साई उर्फ साई छोटूराम आणि इम्तियाज जलील यांच्यातील फरक दिसेल.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण एमआएम नेते नाही तर उल्हासनगरमधील वासन शहा ‘दरबार’चे छोटू साई यांच्या पाया पडत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण इम्तियाज जलील यांच्या पाया पडले का? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *