
जोहरान ममदानी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर आहेत. त्यांच्या विजयानंतर इंटरनेटवर इस्लामद्वेषी अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरू लागल्या. याचाच भाग म्हणून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुखवटा धारक व्यक्ती पुतळ्यावर चढून पॅलेस्टिनी झेंडा फडकवताना दिसतो.
सोबत दावा केला जात आहे की, अमेरिकेत मुस्लिम महापौर जिंकल्यामुळे तेथे कट्टरवादी असा उन्माद करीत आहेत. या व्हिडिओचा वापर करून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात मुस्लिविरोधी प्रचार केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ ना न्यूयॉर्क शहरातील आहे, ना ममदानी महापौर झाल्यानंतरचा आहे, आणि विशेष म्हणजे हा पुतळासुद्धा इस्रायलच्या राष्ट्रध्यक्षांचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेला व्यक्ती एका पुतळ्यावर चढून पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवताना दिसतो. तसेच खाली फोटोमध्ये उद्धव ठाकरें, हिरवा झेंडा हवेत फिरवणारे लोक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत दिसते.
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “कट्टर मुस्लिम ममदानी महापौर झाल्याचे परिणाम; राष्ट्राध्यक्ष बेंझामिनला इस्लामिक स्कार्फ घातला. उबाठालाही खान महापौर करुन हेच साध्य करायचे आहे.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “उबाठाची पुन्हा बीएमसीत सत्ता आली तर खान मुंबईचा महापौर होणार !”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीची आहे. ममदानी नोव्हेंबर 2025 मध्ये महापौरपदाची निवडणूक जिंकले. म्हणजे हा व्हिडिओ ते महापौर होण्याआधीचा आहे.
स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया नामक युट्यूब चॅनलने 7 नोव्हेंबर 2023 रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बेंजामिन फ्रँकलिनच्या पुतळ्यावर पॅलेस्टाईन समर्थक निदर्शक काफिये (पॅलेस्टाईनचा स्कार्फ/मफलर) घातले.”

मूळ पोस्ट – युट्यूब
पुढील सर्चमध्ये मिडल ईस्ट मॉनिटर न्यूज संस्थेनेदेखील नोव्हेंबर 2023 मध्ये हाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्याचे आढळले.
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डी.सी. या दोन्ही शहरामधील अंतर 364 किलो मीटर आहे.
या दोन्ही शहराचे महापौर वेगवेगळे आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा पॅलेस्टिनी समर्थक अमेरिकेच्या रस्त्यावर निदर्शने करत होती तेव्हा न्यू यॉर्क शहराचे एरिक लेरॉय अॅडम्स (2022-25) आणि वॉशिंग्टन डी.सी. चे म्युरियल एलिझाबेथ बाउसर (2015-सध्या पर्यंत) महापौर होते.
तर जोहरान ममदानी हे 1 जानेवारी 2026 पासून न्यू यॉर्क शहराचे 111 वे महापौर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ जोहरान ममदानी न्यू यॉर्क शहराचा महापौर बनण्याआधीपासून माध्यमांवर आहे. हा 2023 मध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझा-इस्रायल युद्धबंदीच्या मागणीसाठी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये केलेल्या निदर्शनाचा व्हिडिओ आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:मददानी न्यूयॉर्कचे महापौर झाल्यावर तेथे इस्रायलच्या अध्यक्षांच्या पुतळ्याला इस्लामिक स्कार्फ घालण्यात आला का?
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


