
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे “सत्तधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा,” असे सांगत आहेत.
विरोधी पक्षात असूनदेखील उद्धव ठाकरे सत्तधारी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची (विभाजन होण्यापूर्वीची शिवसेना) युती होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, नरेंद्र मोदी सोडले तर काँग्रेस कडे असा एक तरी चेहरा आहे का जो पंतप्रधान पदाची खुर्ची संभाळेल ? कोणी राहिलेले नाही. सर्व भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. तुम्ही नरेंद्र भाईला नाही तर तुमच्या भवितव्याला मत देत आहात.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हो उद्धवजी… मुंबईकर भाजपलाचं भरघोस मतांनी विजयी करतील.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा असून मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवरील महायुतीचं शक्तीप्रदर्शन सभेचा आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजप या दोन्ही पक्षाची 2014 मध्ये युती होती.
भाजपने आपल्या आधिकृत युट्यूब चॅनलवर 21 एप्रिल 2014 रोजी या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते.
या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करतात आणि भाजपला मतदान करण्याचे जनतेला आवाहन करतात.
उद्धव ठाकरेंनीदेखील या भाषणाचा हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या स्रीनशॉर्टमध्ये आपण देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि नरेंद्र मोदींना पाहू शकतो.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
शिवसेना-भाजप महायुती
शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. परंतु, इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक काँग्रेस जिंकली आणि परभवाचे विश्लेषण करताना ‘शिवसेनेशी युती केल्यामुळेच भाजपच्या पदरी परभवाची नामुष्की आली’ असा मुद्दा भाजपचे उमेदवार राम जेठमलानी यांनी मांडला आणि परिणामी युती तुटली.
प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नातुन 1989 मध्ये भाजप- शिवसेनेची परत युती झाली आणि ती टिकून राहिली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 41 ते 42 खासदार निवडून आले होते. अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 9 वर्षांपूर्वीचा आहे. 2014 मध्ये भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे) महायुती असताना उद्धव ठाकरेंनी भाजपला मतदान करण्याचे जनतेला आवाहन केले होते. खोट्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:उद्धव ठाकरेंद्वारे नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


