संजय राऊत औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हणाले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

सध्या औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, संजय यांनी औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असून संजय राऊत यांनी औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हटले नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणताना दिसतात की, “शौर्याचे प्रतीक आहे आणि ते कधी तुटले नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे. औरंजेब किंवा अफजल खानची कबर असो ही येणाऱ्या पिढीला दिसली पाहिजे. जर इतिहासाला कोणी समजुन घेत नसतील तर ते इतिहासाचे शत्रू आहेत.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “औरंग्याची कबर शौर्याचे प्रतीक ?”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

न्यूज-18 लोकमतने संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ 17 मार्च 2025 रोजी शेअर केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण पेटलं; राऊतांचा सरकारला सवाल.”

वरील व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हटले नाही.

एका पत्रकाराने 4:30 मिनिटावर सांगितले की, आजच्या अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे की, औरंगजेबच्या कबरीबद्दल लोकांची जी भूमिका आहे तीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे.

यावर संजय राऊत 4:43 मिनिटावर सांगतात की, “लोकांची आणि एकनाथ शिंदेंची काहीच भूमिका नाही. ही अमित शहांची भूमिका आहे जी एकनाथ शिंदे बोलत आहेत. शौर्यचा प्रतिक आहे आणि तो तुटला नाही पाहिजे. ही आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबसोबत मोठे युद्ध केले. छत्रपतींच्या मृत्यूनंतरही औरंगजेब 25 वर्ष लढत राहिला परंतु, विजय मिळाला नाही आणि तिथे त्याची कबर आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास दिसला पाहिजे. अफजल खानची कबर असो वा औरंगजेबची कबर असो जर कोणी इतिहास समजण्यास तयार नाही; तर ते इतिहासाचे शत्रू आहेत.”

एएनआय, एबीपी माझा, एशियनेट न्यूज आणि न्यूज 24 अशा अनेक माध्यमांवरील बातम्यामध्ये संजय राऊत यांनी औरंगजेबाची कबरी मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळात संजय राऊत ‘औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे’, असे म्हणाले होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:संजय राऊत औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हणाले का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered