
महाराष्ट्रामध्ये विधासभा निवडणूक प्रचार सुरू झाला असून काँग्रेस माजी मंत्री सुनील केदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुनील केदार भाजप समर्थकांना धमकीच्या स्वरात बोलताना दिसतात.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, “भाजपचा झेंडा घेऊन फिरताना दिसलात तर घरात घुसून मारू अशी, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी जनतेला धमकी दिली.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले हा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा असून सध्याच्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये सुनील केदार भाजप समर्थकांना धमकी देतान दिसतात.
तसेच व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “भाजपाचा झेंडा घेऊन फिरतांना दिसलात तर घरात घुसून मारू – सुनील केदार.”
मुळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे.
लोकमतने आपल्या युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ 13 सप्टेंबर 2019 रोजी शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “काँग्रस आमदार सुनील केदार यांची भाजपावाल्यांना धमकी.”
मूळ पोस्ट – लोकमत युट्यूब
टाईम्स नाऊ आणि आज-तकच्या बातमीनुसार सुनील केदार सप्टेंबर 2019 मध्ये नागपूरजवळील सिलवाडा गावात जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उघडपणे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, “सुनील केदार यांनी सिलवाडा गावातील लोकांनी त्यांच्या घराबाहेर भाजपचा झेंडा लावला किंवा भाजपचा झेंडा घेऊन फिरले तर घरात घुसून मारहाण केली जाईल.”
मुळ पोस्ट – टाईम्स नाऊ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा (2001 – 2002) प्रकरणी 2023 मध्ये दोषी ठरवण्यात आले.
केदार यांनी जुलै 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढविता यावी म्हणून उच्च न्यायालयाला केलेली याचिका फेटाळण्यात आली. सुनील केदार हे विधानसभा निवडणूक लढणार नाही.
काँग्रेसने सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा असून सध्याच्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही. तसेच काँग्रेस नेते सुनील केदार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 लढवत नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजप समर्थकांना धमकी दिल्याचा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Missing Context
