
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, राम मंदिर सोहळ्यानिमित्त हैद्राबादमध्ये ही कलश यात्रा काढण्यात आली होती.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर किंवा हैदराबादशी संबंधित नाही. 6 महिन्यांपूर्वी ग्रेटर नोएडामध्ये धिरेंद्र शास्त्रीच्या कथा वाचनादरम्यान ही कलश यात्रा काढण्यात आली होती.
काय आहे दावा ?
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हैद्राबाद येथील अक्षदा कलश यात्रा ने रेकॉर्ड ब्रेक केलं संपूर्ण हैद्राबाद राममय.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओप्रमाणे हैदराबादमध्ये अशी कोणतीही भव्य अक्षत कलश यात्रा काढण्यात आल्याची अधिकृत बातमी आढळली नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 6 महिन्यांपूर्वीचा आहे.
बागेश्वर धाम सरकार यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ 9 जुलै 2023 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ही जैतपूर ग्रेटर नोएडामधील शोभा यात्रा आणि कलश यात्रा आहे.”
खालील व्हिडिओमध्ये 59 सेकंदावर आपण पहिल्या आणि तिसऱ्या फ्रेममध्ये व्हायरल क्लिप पाहू शकता.
ईटीव्ही भारतच्या बातमीनुसार ग्रेटर नोएडामधील जैतपूर येथे गेल्यावर्षी 10 ते 16 जुलै पर्यंत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे 6 दिवस हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ग्रेटर नोएडाच्या वैष्णोमंदिरापासून ते सिटी पार्कमधील पंडालपर्यंत कलश यात्रा काढण्यात आली होती.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ आणि ग्रेटर नोएडामधील कलश यात्रा एकच आहे.

अक्षत कलश यात्रा
श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त लोकांना आमंत्रण देण्यासाठी अक्षत कलश यात्रा विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहीमेत लोकांना अक्षत, श्रीराममंदिराचे चित्र आणि पत्रक दिले जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ हैदराबादचा नाही. 6 महिन्यांपूर्वी ग्रेटर नोएडामध्ये धिरेंद्र शास्त्री यांच्या कथा वाचनादरम्यान ही कलश यात्रा काढण्यात आली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:कलश यात्रेचा हा व्हिडिओ हैदराबादचा नाही; नोएडातील जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
