
केदारनाथ यात्रेला आलेल्या एका प्रवाशाला मारहाण होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसबोत दावा केला जात आहे की, केदारनाथमध्ये घोडा आणि खेचर वाहून नेणारे मुस्लिम लोक प्रवाशांना पायी प्रवास करू न देता बळजबरीने घोड्यावर बसण्यास भाग पाडतात. नकार दिल्यास ते प्रवाशांना मारहाण करतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील प्रवाशांना मारहाण करणारे आरोपी मुस्लिम नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका प्रवाशाला काही लोक बेदम मारहाण करीत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “आश्चर्यकारक दादा गिरी – केदारनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंना मारहाण करणारे आणि त्यांचा अपमान करणारे – हे शांती दूत आहेत, जे प्रवाशांना घोड्यावर आणि खेचरावर बसण्यास जबरदस्ती भाग पाडतात, प्रवाशांनी पायी प्रवास करू नये, अशी धमकी देतात. फक्त तेच दर्शन घेऊ शकतील जे घोड्यावर व खेचरावर बसून जातील. प्रत्येक गटाने हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून प्रशासनाची झोप उडेल – सुरक्षा दलांना सत्य कळेल – धर्मनिरपेक्षतेचा नारा करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला या लज्जास्पद कृत्याचे सत्य कळले पाहिजे.”
मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर ईटीव्ही भारतने दिलेली आढळली. त्या बातमीनुसार ही घटना गेल्या महिन्यात केदारनाथ यात्रा मार्गावर घडली होती. दिल्लीवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना घोडा आणि खेचर वाहकांनी मारहाण केली होती.

मारहाणीचे कारण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित दिल्लीचा रहिवासी असून त्याचे नाव तनुका पोंडार आहे. 10 जून रोजी सकाळी ते आपल्या कुटुंबासह गौरीकुंड ते केदारनाथ धामला पायी जात होते. त्यांना भीमबली पुलाजवळ एक आजारी घोडा पडलेला दिसला. या घोड्यासाठी तनुका इतर यात्रेकरूंकडे मदत मागू लागले. दरम्यान, जवळच एक व्यक्ती इतर घोडे व खेचरांना मारत होती. तुनकांनी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांनी केवळ त्या व्यक्तीला घोड्याला का मारत आहे असे विचारले. यावरून तो भांडण करू लागला व तेथे घोडे वाहकांची टोळी आली. त्या सर्वांनी मिळून तनुका आणि इतर सहकाऱ्यांना केली व त्यांना उत्तराखंड सोडण्याची धमकी दिली
पोलिसांची कारवाई
हिंदुस्थान समाचारच्या बातमीनुसार पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल करून 12 जून रोजी 5 आरोपींना अटक करीत आरोपींचा व्यवसाय परवाना रद्द केला. आरोपींविरुद्ध कलम 147/323/504/506 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अंकित सिंग, संतोष कुमार, रोहित कुमार आणि गौतम सिंह अशी आहेत. आरोपींमध्ये तसेच एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
रुद्रप्रयाग पोलिसांनी ट्विटद्वारे माहिती दिली की केदारनाथ धाम पदपथावर यात्रेकरूंवर हल्ला करणार्या पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने रुद्रप्रयाग पोलिसांशी संपर्क साधला आहे. तेथील एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, भीमबली पूल परिसरात प्रवाशांवर हल्ला करणारे घोडेवाहक मुस्लिम नव्हते. या प्रकरणात कोणतेही सांप्रदायिक कारण नसून हे सर्व आरोपी स्थानिक रहिवासी आहेत.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील सहप्रवाशांवर हल्ला करणारे घोडेस्वार हे मुस्लिम नव्हते. या प्रकरणात कोणताही सांप्रदायिक कारण नसून हे सर्व आरोपी स्थानिक रहिवासी आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:केदारनाथमध्ये मुस्लिम घोडेवाहकांनी प्रवाशांवर हल्ला केल्याची खोटा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
