
शिवसेनेतून बंड करून भाजपच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. त्यातच एक भर म्हणून आता पोस्ट फिरत आहे की, अडाणी ग्रुपने मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला शिफ्ट केले. सोबत पुरावा म्हणून साम टीव्हीच्या बातमीचा व्हिडिओ फिरत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, ही बातमी एक वर्षे जुनी असून, अडाणी समूहातर्फे याबाबत खुलासादेखील करण्यात आला होता की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहणार आहे.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये साम टीव्ही वाहिनीच्या व्हिडिओ बातमी दिली आहे की, “मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अडाणी समूहाने या विमानतळाचे मुख्यालय गुजरातच्या अहमदाबाद शहरात हलविले. मुंबईचे विमानतळ खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अडाणी समूहाने मुंबईत मुख्यालय स्थापन केले होते, परंतु, विमानतळाचा ताबा येताच मुंबईतील मुख्यालय बंद करून ते अहमदाबादला शिफ्ट केले.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
या पोस्टवरून लोक कमेंटमध्ये टीका करत आहेत की, “नवे सरकार येताच महाराष्ट्राचे उद्योग-व्यवसाय गुजरातला जाऊ लागले. नवीन सरकार यासाठीच स्थापन केले होते का?”
तथ्य पडताळणी
गेल्या वर्षी जुलै महिन्यात अडाणी समूहाने मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतले होते. मुंबई विमानतळ पूर्वी जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात सापडल्याने अडाणी समूहाने मुंबई विमानतळ खरेदी केले.
सर्वप्रथम ‘साम टीव्ही’ची मूळ बातमी शोधली. कीवर्ड्स सर्चमधून कळाले की, साम टीव्हीने दिलेली ही बातमी एक वर्ष जुनी आहे. साम टीव्हीने 20 जुलै 2021 रोजी ही बातमी युट्युब अकाउंटवर अपलोड केली होती. बातमीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘महाराष्ट्र टाईम्स’नेसुद्धा 20 जुलै 2021 रोजी याविषयी बातमी दिली होती की, “मुंबईचे विमानतळ ताब्यात येताच अडाणी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलविले आहे. मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत अडाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने (AAHL) मुंबईत मुख्यालय सुरू केले होते. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन व्यवस्थापन पूर्ण होताच मुंबईतील मुख्यालय बंद करून अहमदाबादला हलवले आहे. यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे.”
यावरून हे स्पष्ट होते की, विमानतळाचे मुख्यालय हलविण्याची ही बातमी जुनी आहे.
ALSO READ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला का?
पण मुख्यालय मुंबईतच!
मुंबईतील मुख्यालय गुजरातला जाणार अशी बातमी पसरू लागताच तत्कालिन सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या निर्णयाचा जोरदार विरोध केला. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा केंद्राचा डाव असल्याची टीका होऊ लागली.
या पार्श्वभूमीवर अडाणी समूहाने तेव्हा खुलासा केला की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहणार. मुख्यालय हलवण्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत.
“मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला जाणार, ही केवळ अफवा आहे. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहणार आहे. मुंबईचा गौरव वाढविणे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण करणे हाच आमचा उद्देश्य आहे,” असे अडाणी समूहाने 20 जुलै 2021 रोजी ट्विट केले होते.
ALSO READ: एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल
ही बातमी कुठून आली?
मुंबई विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अडाणी समूहाने त्याच्या व्यपस्थापनामध्ये मोठे बदल केले होते. त्याचाच एक भाग म्हणून अडाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (AAHL) कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात येणार होते. तसे कंपनीने जारी केलेल्या प्रेस रीलिजमध्ये नमूदही करण्यात आले होते. परंतु, चोहीबाजुने टीका होऊ लागल्यानंतर कंपनीने मुख्यालय हलवण्याची माहिती निराधार असल्याचा खुलासा केला होता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, अडाणी समूहाने मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलविले नाही. तसेच व्हायरल होत असलेली ‘साम टीव्ही’ची बातमी एक वर्ष जुनी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जुनी बातमी संदर्भाशिवाय शेअर केली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Title:शिंदे सरकार येताच अडाणी ग्रुपने मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला नेले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Misleading
