
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर कोसळून बुधवारी मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो म्हणून अनेक जुने व असंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये दुर्गम भागात हेलिकॉप्टर उतरताना कोसळताना दिसते. यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांच्या अपघाताचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून, अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अपघाताचा आहे.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, डोंगरमाथ्यावर लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा तोल जातो आणि जमिनीवर असणारे काही ऑफिसर लगेच तिकडे पळतात.
या व्हिडिओला काल झालेल्या अपघाताचा समजून अनेकांनी कॅप्शन दिले की, “हेलिकॉप्टर क्रॅश होऊन भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत शहिद. भावपूर्ण श्रद्धांजली.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह । फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. त्याकरिता व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. आलेल्या परिणामांमधून कळाले की हा व्हिडिओ गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अपघाताचा आहे.
हिंदुस्थान टाईम्सने हाच व्हिडिओ 19 नोव्हेंबर 2021 रोजी युट्यूबवर अपलोड केलेला आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमध्ये रेशन घेऊन आलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा उतरत असताना अपघात झाला.
‘ईस्ट मोजो’च्या बातमीनुसार, हा अपघात 18 नोव्हेंबर रोजी अरुणाचलमधील अंजाव जिल्ह्यातील लोहित सेक्टरमध्ये झाला होता. एका स्थानिक रहिवाशाने हेलिकॉप्टरचा अपघात होत असताना व्हिडिओ काढला होता.
सदरील अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. सैनिकांसाठी रेशन घेऊन आलेल्या MI-17 बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये लँडिंगच्या वेळी तांत्रिक अडचण आल्यामुळे त्याचा तोल गेला होता.
ANI वृत्तसंस्थेने सुद्धा हा व्हिडिओ शेअर करीत याविषयी बातमी दिली होती.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह जनरल बिपिन रावत यांच्या अपघाताचा म्हणून पसरविला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अरुणाचलमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा जुना व्हिडिओ बिपिन रावत यांच्या अपघाताचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
