
सोशल मीडियावर सैनिकाच्या सांगाड्याचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. या सैनिकाने गतप्राण झाल्यानंतरही हातातली बंदूक सोडली नाही. बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्याचा सांगाडा सापडला तेव्हाचा हा फोटो असल्याचे इंटरनेटवर म्हटले जात आहे. जगभरातील विविध देशांमध्ये हा फोटो त्या त्या देशांतील सैनिकाचा म्हणून पसरविला जातो.
मागे हाच फोटो कारगिल युद्धातील शहीद सैनिक आणि अहिर रेजिमेंटमधील जवान असल्याचाही दावा करण्यात आला होता. आतादेखील या फोटोवरून लाईक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा खऱ्याखुऱ्या सैनिकाचा फोटो नाही.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमधील फोटोमध्ये एका टेडकडीवर सैनिकाचा सांगडा दिसतो. त्याच्या हातात केवळ गंजलेली बंदूक, सेफ्टी हेल्मेट आणि पायात बूट आहेत.
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
आम्ही पडताळणी सुरू केल्यावर कळाले की, हा फोटो यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये मृत पावलेल्या रशियन सैनिकाचा म्हणून पसरविण्यात आला होता. तसे तुर्कस्थानच्या सैनिकाचा म्हणूनही शेअर झाला होता.
यावरून स्पष्ट होते की, हा एकच फोटो वेगवेगळ्या देशांतील सैनिक म्हणून फिरत आहे. त्यामुळे त्याचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.
इंटरनेटवर हा फोटो वापरण्यात आलेल्या शेकडो वेबपेजसची छाणनी केल्यावर Weathered Models नावाच्या फेसबुक ग्रुपवर हा फोटो आढळला.
त्यातील माहितीनुसार, दिलीप सरकार नामक एका कलाकाराने 2017 मध्ये तयार केलेल्या मिनिएचर मॉडेलचे हे फोटो आहेत. इंग्लिशमध्ये या कलाप्रकाराला Diorama म्हणतात. ऐतिहासिक घटना किंवा प्रसंगाची वास्तवदर्शी मांडणी यामध्ये केली जाते.
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्वतः दिलीप सरकार यांनी माहिती दिली की, ‘मिलटरी मॉडेलिंग’ मॅगझिनच्या फेब्रुवारी 2017 अंकासाठी त्यांनी हे शिल्प तयार केले होते. या मॅगझिनमध्ये याविषयी सविस्तर लेखसुद्धा छापून आला होता. त्यानुसार, हे एका जर्मन सैनिकाचे अनुभव मांडणारे शिल्प आहे.
मॅगझीनमधील ‘Missing in Action – Rest in Peace?’ नावाच्या लेखात दिलीप सरकार यांनी हे शिल्प कसे तयार केले हे कृतीसह सांगितले आहे. फोटोमध्ये दिसणारा सांगाडा खरा नाही. ते 1/6 Airfix Skeloton नावाचे प्रोडक्ट आहे.
जगभरात जमिनीखाली गाडले गेलेले असे लाखो सैनिक आहेत जे अजूनही सापडलेले नाहीत. त्यांच्या सन्मानासाठी सरकार यांनी या मॉडेलची निर्मिती केली होती.
मूळ मॅगझिन – मिलिटरी मॉडलिंग
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, एका कलाकाराने तयार केलेल्या एका वास्तवदर्शी शिल्पाचा फोटो खऱ्याखुऱ्या सैनिकांचा सांगडा म्हणून शेअर केला जात आहे. सैनिकांच्या बलिदानाला सलाम करण्याची भावना खरी आहे; फक्त फोटोचे सत्य थोडे वेगळे आहे. शेअर करण्यापूर्वी केवळ लक्षात असावे.
[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये!]

Title:हा खरंच बंदुक धरलेल्या सैनिकाच्या सांगाड्याचा फोटो आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
