
सोशल मीडियावर सध्या शेतकरी आंदोलनाचीच चर्चा आहे. त्यात भर म्हणून आता एका व्यक्तीला शेतकरी मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोबत दावा केला की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी उमेश सिंग नावाचा भाजपचा नेता ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला असे चोपले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्यक्ती ना भाजपचा नेता आहे, ना त्याचे नाव उमेश सिंग आहे आणि ना त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, निळे जॅकेट घातलेल्या एका व्यक्तीला पोलिस हवालदार घेऊन जात असताना पांढरे कपडे घातलेले काही जण त्या व्यक्तीला मारत आहेत. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “भाजपा नेता उमेश सिंग खलिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देताना पकडले गेले. शेतकऱ्यांना बदनाम करणारी तुम्ही सगळे ****.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडिओ ‘भारत समाचार’ असा लोगो स्पष्ट दिसतो. त्यानुसार शोध सुरू केल्यावर कळाले की, ‘भारत समाचार’ वृत्तवाहिनीच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ सापडला. 14 डिसेंबर रोजीच्या ट्विटनुसार, दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवरील ही घटना आहे. ‘अरुण’ नावाच्या या व्यक्तीला आंदोलक शेतकऱ्यांनी मारहाण केली होती. सोबत गाझियाबाद पोलिसांनासुद्धा टॅग करण्यात आलेले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ट्विटमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावल्यामुळे मारहाण झाल्याचा उल्लेख नाही. तसेच मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव ‘अरुण’ म्हटले आहे.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर कळाले की, सदरील घटना खोदा पोलिस ठाण्याअंतर्गत घडली होती. फॅक्ट क्रेसेंडोने तेथील प्रमुख मोहम्मद असलम यांच्याशी संपर्क साधला. या व्हिडिओसंबंधी सोशल मीडियावर केले जाणाऱ्या दाव्यांचे त्यांनी खंडन केले.
ते म्हणाले की, ‘मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव उमेश सिंग नसून अरुण कुमार (रा. सहारनपूर) आहे. झाले असे की, घटनास्थळी अरुणने रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना शिवीगाळ केली. त्यावरून पत्रकार आणि त्याच्यामध्ये भांडण सुरू झाले. हे पाहून शेतकऱ्यांना वाटले की, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी अरुण कुमार जाणूनबुजून असे करीत आहे. त्यामुळे त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. दरम्यान, रिपब्लिकच्या पत्रकारांनी पोलिसांना बोलावून घेतले. परिस्थिती शांत करण्यासांठी आम्ही अरुणला ठाण्यात नेले (जसे की, व्हिडिओमध्ये दिसते). याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल न झाल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.’
अरुण कुमारचा भाजपशी काही संबंध आहे का?
असलम यांनी हा दावा नाकारत सांगितले की, अरुण कुमार कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. तसेच त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारेसुद्धा लावले नाव्हते. केवळ पत्रकारांना शिवीगाळ करण्यावरून संतप्त शेतकऱ्यांनी त्याला मारहाण केली, एवढेच हे प्रकरण आहे. त्याला विनाकारण चुकीचा रंग देऊ नये.
यानंतर आम्ही किसान संघाचे प्रमुख राकेश टिकैत यांच्याशी संपर्क साधला. व्हिडिओत पांढऱ्या कपड्यांमध्ये ते दिसतात. त्यांनी सांगितले की, ‘प्रदर्शनस्थळी पाकिस्तान समर्थनात नारेबाजी झाली नव्हती. केवळ सरकारधार्जिण मीडियाविरोधात लोक घोषणा देत होते. त्यात एका व्यक्तीने शिवीगाळ केली. शांततापूर्वक सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्या व्यक्तीला आम्ही अडविण्याचा प्रयत्न केला. तो कोण होता हे आम्हाला माहित नाही.’
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हिडिओत दिसणारा व्यक्ती भाजपचा नेता नाही. तसेच त्याचे नाव उमेश सिंग नसून, अरुण कुमार आहे. त्याने ‘पाकिस्तना जिंदाबादचे’ही नारे लावले नव्हते. त्याने पत्रकारांना शिवीगाळ केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्याला अडविले. त्यामुळे सोशल मीडियावर केले जाणारे दावा खोटे आहेत.

Title:‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्याला मारले का? वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
