2020 मधील ग्रांट रोड पुराचा व्हिडिओ पनवेलमधील पूर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असून, प्रचंड नुकसान झाले आहे. 

अशा पार्श्वभूमीवर रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचलेल्या पाण्यात अनेक चारचाकी वाहने तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पनवेल येथील असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ग्रांट रोड येथील असून, गेल्या वर्षी झालेल्या पावसाचा आहे.

काय आहे दावा?

एका वाहनातून चित्रित केलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावर कंबरेइतके पाणी साचलेले आहे. या पाण्यात अनेक कार तरंगत असल्याचेही दिसते. इतकी भयावह परिस्थिती पनवेलमधील असल्याचे व्हिडिओसोबत म्हटले आहे.

मूल पोस्ट – फेसबुक 

हाच व्हिडिओ यंदाची मुंबईतील पूरस्थिती म्हणूनही शेअर होत आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाहू की, व्हिडिओ नेमका कधीचा आहे. व्हिडिओतील कीफ्रेमला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

23 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रांट रोड भागात साचलेले पाणी म्हणून व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. तो तुम्ही येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

म्हणजेच हा व्हिडिओ या वर्षीचा नाही. मग हा नेमका कुठला ते पाहुया.

गुगल मॅपच्या सहाय्याने ग्रांट रोड भागामध्ये शोध घेतल्यावर कामा बाग भागातील हा व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. 

मुख्यतः पारसी बहुल या भागातील 14 क्रमांकाच्या गल्लीतील खेतवाडी मार्गाचा हा व्हिडिओ आहे. गुगल मॅपवरील उपलब्ध फोटो आणि व्हिडिओत दिसणारे स्थळ यांची तुलना केल्यावर सिद्ध होते की, हा व्हिडिओ कामा बाग भागातील आहे; पनवेलचा नाही.

स्त्रोत – गुगल मॅप

गेल्या वर्षी काय झाले होते?

भारतीय हवामान खात्याने 23 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशार दिला होता. त्यानुसार अनेक भागांमध्ये 300 मि.मी. पेक्षाही जास्त पाऊस पडला होता. 10-12 तासांपेक्षा अधिक काळ पाणी साचलेले होते. नायर रुग्णालयात गुडघाभर पाणी भरले होते.

तत्पूर्वी बृहन्मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गेल्या वर्षीचा ग्रांट रोड येथील पाण्याचा व्हिडिओ पनवेलमधील सध्याची पूरस्थिती म्हणून व्हायरल केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:2020 मधील ग्रांट रोड पुराचा व्हिडिओ पनवेलमधील पूर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False