गुजरातमधील पाच वर्षे जुना व्हिडिओ श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा वावर म्हणून व्हायरल

False सामाजिक

श्रीरामपूर शहरामध्ये बिबिट्या आढळला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्या शरहात आल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरल्याचे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ ना बिबट्यांचा आहे, ना श्रीरामपुरमधील.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

एका गल्लीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन दिली आहे, की बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीरामपूर शहरात नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज केले. त्यातून कळाले हा व्हिडिओ 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

एबीपी अस्मिता चॅनेलने या व्हिडिओची बातमी देताना माहिती दिली होती, की गुजरातमधील वीरपूर गावातील हा व्हिडिओ आहे. गिर अभयारण्याजवळील या गावात दोन सिंह आले होते. 

इंडिया डॉट कॉम वेबसाईटच्या बातमीनुसार, अमरेली जिल्ह्यातील धारी तालुक्यातील वीरपूर गावात सिंह आले होते. सासण गिर हा भाग सिंहांसाठी प्रसिद्ध आहे.

युट्यूबवर Viral India चॅनेलनेसुद्धा 19 डिसेंबर 2016 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच याप्रसंगाचा दुसरा व्हिडिओसुद्धा त्यांच्या चॅनेलवर उपलब्ध आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने वीरपूर गावातील सरपंच निलूबेन जोशी यांच्याशी संपर्क साधला. हा व्हिडिओ पाहुन त्यांनी सांगितले, की हा व्हिडिओ त्यांच्याच गावातील आहे. 2016 मध्ये गावात सिंहाची ही जोडी आली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला होता. 

मग श्रीरामपूरमध्ये बिबट्या आला का?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात डिसेंबर 2021 महिन्यात बिबट्या आढळला होता. रहिवासी भागात बिबट्या आल्याने एकच खळबल माजली होती. 

एबीपी माझा वाहिनीने या बिबट्याचा व्हिडिओसुद्ध प्रसारित केला होता. बातमीनुसार, सुमारे चार तासांच्या कसरतीनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गुजरातमधील पाच वर्षांपूर्वीचा सिंहांचा व्हिडिओ श्रीरामपूरमध्ये बिबट्या आला म्हणून व्हायरल होत आहे. श्रीरामपूरमध्ये डिसेंबर महिन्यात बिबट्या आढळला होता; परंतु हा व्हिडिओ त्यावेळीचा नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरातमधील पाच वर्षे जुना व्हिडिओ श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा वावर म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False