FACT CHECK: ‘मोदींना मत म्हणजे तुमच्या भवितव्याला मत’ असे उद्धव ठाकरे कधी म्हणाले?

Missing Context राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जुने व्हिडिओ संदर्भाशिवाय शेअर करून दिशाभूल केली जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकेर नरेंद्र मोदींना मत देण्याचे जोरदार आवाहन करताना दिसतात. यावरून विरोधात असुनही उद्धव ठाकेरेंनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचे समर्थन केले असा अर्थ काढला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. 

पडताळणीअंती कळाले की, उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ 2014 साली केलेल्या भाषणाचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह शेअर केला जात आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुम्ही तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात.”

या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या मराठी माणसाचं सांगणं जरा मनावर घ्या आणि तुम्ही Narendra Modi भाईना मत देत नाही आपण आपल्या भवीतव्यला मत देत इहात हे लक्षात ठेवा.”

मूळ पोस्ट – इन्स्टाग्रामअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील भाषणातील मजकुरानुसार कीवर्ड सर्च केले असता कळाले की, ही क्लिप दहा वर्षांपूर्वीची आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यानुसार, 21 एप्रिल 2014 रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत उद्धव ठाकरेंनी हे भाषण केले होते.

खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये 11.28 व्या मिनिटांपासून व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता.

अर्काइव्ह

तत्कालिन शिवसेना आणि भाजप यांची 2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये युती होती. त्यानुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबईमध्ये ही सभा घेतली होती. यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि नरेंद्र मोदी उपस्थित होते. 

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “देशाचा चेहरा कसा असला पाहिजे हा प्रश्न तुमच्या मनाला विचारा. नरेंद्र मोदी यांचा पर्याय बाजूला ठेवला तर दुसरा पर्याय तुम्ही देताय? एक तरी चेहरा काँग्रेसकडे आहे का जो पंतप्रधान पदाची उंची, मान मरातब सांभाळेल? कोणी राहिलेले नाही. सगळे बरबरटलेले आहेत. तुम्ही नरेंद्र भाईंना मद देत नाही आहात, तुम्ही तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात.”

झी-24 तास वाहिनीच्या युट्यूब चॅनेलवरदेखील याच सभेचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

उद्धव ठाकेर वि. भाजप संघर्ष

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील (तत्कालिन अविभाजित) शिवसेना आणि भाजप यांची 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाआघाडी करून सरकार स्थापन केले होते. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना पक्षाचे विभाजन केले. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, उद्धव ठाकरेंचा मोदींना मत देण्याचे आवाहन करतानाचा व्हिडिओ दहा वर्षे जुना असून तेव्हा ते भाजपसोबत युतीमध्ये होते. सध्या उद्धव ठाकरे गट भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे जुना व्हिडिओ शेअर करून चुकीचा समज पसरविला जात आहे की, विद्यमान निवडणुकीतही ठाकरेंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी समर्थन केले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FACT CHECK: ‘मोदींना मत म्हणजे तुमच्या भवितव्याला मत’ असे उद्धव ठाकरे कधी म्हणाले?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Missing Context