
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या-त्यांच्या राज्यांत पाठवण्यात येत आहे. देशभरात अशा श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. अशाच एका श्रमिक रेल्वेतून काही मजुरांनी शिळ्या अन्नाची पाकिटे फेकून दिल्याचा व्हिडियो अलिकडे व्हायरल झाला.
त्यानंतर आता जमिनीवर पोळ्या फेकून दिल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात असून, मुंबईतील परप्रांतीय मजुरांनी अशा प्रकारे अन्नाची नासडी केली असा याद्वारे दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोतर्फे याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?
अन्ना नासडीचा फोटो शेयर करून म्हटले की, “ज्या परप्रांतीयांना खरंच मुंबईत उपासमार होत होती त्यांनी जाताना ही अन्नाची नासडी केली. महाराष्ट्र सरकार मुर्दाबादचे नारे लावले.”
याखाली अनेक लोकांनी परप्रांतीय मजुरांविरोधात मत व्यक्त करीत त्यांना परत महाराष्ट्रात न येऊ देऊ नये असेल म्हटले.
कोरोना संकटसमयी समाजात फूट पाडणाऱ्या अशा पोस्टची सत्यता तपासणी करा, अशी फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअपवर (9049043487) हा फोटो पाठवून विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाह – फेसबुक । फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
हा फोटो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो 7 वर्षांपूर्वीचा आहे. तसेच तो मुंबईतील नाही.
असोसिएट प्रेस (एपी) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने 2013 साली प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत हा फोटो वापरण्यात आला होता. फोटो खालील कॅप्शननुसार हा फोटो गुजरातच्या अहमदाबाद शहरातील साबरमती नदी किनारी 5 जून 2013 रोजी काढण्यात आला होता. ‘एपी’चे फोटोग्राफर अजीत सोलंकी यांनी हा फोटो काढला होता.

मूळ फोटो येथे पाहा – एपी न्यूज । अर्काइव्ह
मग अन्न कोणी, कुठे आणि का फेकुन दिले?
केरळमध्ये अडकलेल्या मजुरांना बिहारमध्ये नेण्यासाठी चालविण्यात आलेल्या रेल्वेतील मजुरांनी पश्चिम बंगालमधील आसनोल स्टेशनवर अन्नाची पाकिटे फेकून दिली होती. शिळे अन्न दिल्याची तक्रार करीत त्यांनी खिडकीतून पाकिटे प्लॅटफॉर्म फेकली होती. तसेच त्यांनी आसनसोल रेल्वे प्रशासनाविरोधात नारे दिले होते. या घटनेचा महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही संबंध नाही.
याविषयी अधिक सविस्तर येथे वाचा:
पश्चिम बंगालमध्ये परप्रांतियांनी अन्नाची पाकिटे फेकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल
निष्कर्ष
जमिनीवर पोळ्या फेकून दिल्याचा हा फोटो 2013 सालचा गुजरातच्या अहमदाबाद येथील आहे. मुंबईतील परप्रांतीय मजुरांनी अन्नाची अशा प्रकारे नासडी केली नव्हती. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:अन्न नासडीचा हा फोटो 7 वर्षांपूर्वीचा गुजरातमधील आहे; मुंबईतील परप्रांतीय मजुरांचा याच्याशी काही संबंध नाही.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
