खरंच व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का? जाणून घ्या सत्य

False राष्ट्रीय

गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर व्हिएतनाम आणि शिवाजी महाराजांचा संबंध जोडणा-या बातम्या आणि फेसबुक पोस्ट पसरविल्या जात आहेत. लोकसत्ता या वृत्तस्थळानेदेखील शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी एक बातमी प्रसिद्ध केली की, व्हिएतनामसारख्या लहानशा देशाने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराभूत केले. तसेच त्यांच्या सन्मानार्थ व्हिएतनाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळादेखील उभारण्यात आला.

या बातमीची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरून ही बातमी शेयर करण्यात आलेली आहे. पडताळणी करेपर्यंत ही बातमी 403 वेळा शेयर झालेली होती. तसेच तिला सुमारे पाच हजार लाइक्स मिळालेल्या होत्या.

लोकसत्ता-फेसबुक अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा याबाबतीत शोध घेतला असता समोर आले की, अगदी 2013 पासून अशा प्रकारच्या बातम्या आणि पोस्ट इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

वर्ल्ड हिंदू न्यूज नावाच्या वेबसाईटवर 12 डिसेंबर 2013 रोजी ही बातमी अपलोड करण्यात आली होती. ती मूळ बातमी येथे वाचा – वर्ल्ड हिंदू न्यूजअर्काइव्ह

हिंदू जनजागृती समिती नावाच्या वेबसाइटवरदेखील ही बातमी उपलब्ध आहे. ती मूळ बातमी येथे वाचा – हिंदू जनजागृती समितीअर्काइव्ह

आता लोकसत्ताच्या बातमीतील दाव्यांची सत्यता तपासून पाहू.

दावा क्र. 1 : व्हिएतनामची राजधानी हो ची मीन या शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

लोकसत्ताच्या बातमीत या पुतळ्याचा फोटो दिलेला नाही. हा पुतळा कधी बांधण्यात आला याचा उल्लेख नाही. तसेच हो ची मिन ही व्हिएतनामची राजधानी नाही. हानोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. 

गुगलवर (Shivaji Maharaj statue in Vietnam) असा शोध घेतला असता पुढील फोटो प्रामुख्याने समोर येतो. हा फोटो नत्था नावाच्या एक ट्विटर यूजरने 19 फेब्रुवारी 2015 रोजी शेयर केला होता.

नत्था ट्विवटर-अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने (horse statues in ho chi minh city) असे गुगलवर सर्च केले. तेव्हा खालील फोटो समोर आले.

त्यावरून हा फोटो त्राण ग्यून हान (Tran Nguyen Han) यांचा असल्याचे कळाले. हा फोटो विकिपीडिया वर पाहू शकता.

हा पुतळा Ben Thanh मार्केट जवळ आहे. मग आम्ही गुगल मॅप्सवर The statue of Tran Nguyen Han चा शोध घेतला. त्याचे गुगल मॅप पाहण्यासाठी येथे क्लिक करा. स्ट्रीट व्ह्यूव केल्यावर खालील चित्र दिसते.

खाली नत्थाने ट्विटर शेयर केलेला फोटो आहे.

देन्ही फोटोंची तुलना केल्यावर कळते की, व्हिएतनामची राजधानी हो ची मीन या शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. तो त्राण ग्यून हान यांचा आहे.

दावा क्र. 2: व्हिएतनामच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्र्यांनी रायगडावरील माती सोबत नेली.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, युद्धानंतर व्हिएतनामच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्र्यांनी भारतात येऊन शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचे दर्शन घेऊन तेथील माती सोबत नेली होती. याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या की, “ही माती शुरांची आहे, या मातीत महान राजा जन्माला आला. हिच माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे, जेणेकरुन आमच्या देशातही असे शूर पुरुष जन्माला येवोत.”

या परराष्ट्र मंत्री कोण, त्यांचे नाव काय याचा काहीच उल्लेख बातमीत नाही. बातमीनुसार त्या महिला असाव्यात असे दिसते. कारण “त्या म्हणाल्या” असे लिहिलेले आहे. विशेष म्हणजे व्हिएतनाम युद्धानंतर एकही महिला परराष्ट्रमंत्री झालेल्या नाहीत. खालील फोटोत व्हिएतनामच्या 1965 पासूनच्या परराष्ट्रमंत्र्याची विकिपीडियावरील यादी दिलेली आहे.

विकिपीडियावरील यादीअर्काइव्ह

याबरोबरच बातमीत म्हटले आहे की,   शिवरायांच्या युद्धनितीतील गनिमी काव्याचा वापर केल्याची नोंद व्हिएतनामने केली आहे.

ही नोंद कुठे, कोणत्या पुस्तकात, भाषणात किंवा अधिकृत कागदपत्रांत करण्यात आली याचा उल्लेख बातमीत नाही.

निष्कर्ष – असत्य

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हे सिद्ध होते की, लोकसत्तेच्या बातमीत कोणत्याही सबळ पुराव्यांअभावी आणि असत्य माहितीच्या आधारावर दावे करण्यात आले आहेत. हो ची मीन या शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो, त्राण ग्यून हान (Tran Nguyen Han) यांचा आहे. तसेच युद्धानंतर व्हिएतनामच्या कोणतीही महिला परराष्ट्रमंत्री झालेल्या नाहीत. त्यामुळे ही बातमी असत्य आहे.

Avatar

Title:खरंच व्हिएतनामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False