
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसे एकनाथ शिंदे यांनीदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
दरम्यान सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, 1992 साली बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस आणि शिंदे कारसेवक म्हणून अयोध्येत एकत्र उपस्थित होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. या फोटोत फडणवीस यांच्यासोबत एक शिंदे नसून भाजपचे नेते भोजराज डुंबे आहेत. तसेच हा फोटो बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनाचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक व्यक्ती दिसते.
युजर्स हा फोटो शेअर कराताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कारसेवक म्हणून बाबरी विध्वंस दिवशी उपस्थित.”
https://archive.org/details/scrnli_4LT1vBqeysxVtG
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर महाराष्ट्र टाइम्सने 3 मे 2022 रोजी हाच फोटो शेअर केल्याचे आढळले.
बातमीनुसार, काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले होते की, अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्याठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता. मी त्याठिकाणी होतो, मला ही गोष्ट माहिती आहे.
फडणवीसांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अंबादास दानवे सदरील फोटो शेअर करून टीका केली होती की, ‘लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हने बाबरी पाडायला गेला होता’.
बातमीत केवळ देवेंद्र फडणवीस यांचे एका आंदोलनातील जुने छायाचित्र, असा उल्लेख आहे. यामध्ये फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे असल्याचे म्हटलेले नाही.
मूळ बातमी – महाराष्ट्र टाइम्स
फॅक्ट क्रेसेंडोने नागपूरमधील भाजप प्रवक्ते चंदन गोस्वामी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करताना सांगितले की, फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते भोजराज डुंबे आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोसोबत बोलल्यानंतर गोस्वामी यांनी ट्विट करूनदेखील हा खुलासा केला.
मूळ पोस्ट – ट्विटर
फॅक्ट क्रेसेंडोने मग भोजराज डुंबे यांच्याशीसुद्धा संपर्क केला. ते म्हणाले की, “व्हायरल फोटोमधील व्यक्ती मीच आहे. हा फोटो 2002 सालचा असून तेव्हा मी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM), नागपूरचा अध्यक्ष होतो, तर फडणवीस हे बीजेवायएमचे प्रदेश महामंत्री होते. त्यावेळी आम्ही लोडशेडिंग विरोधात आंदोलन केले होते. नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरातील हा फोटो आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा आहे. या फोटोत फडवणीस यांच्याबरोबर दिसणारी व्यक्ती एकनाथ शिंदे नसून भाजपचे नेते भोजराज डुंबे आहेत. तसेच हा फोटो 2002 मधील लोडशेडिंगच्या विरोधातील आंदोलनाचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र कारसेवक म्हणून काम केलंय का? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
