
वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मुळे देशात या बाबत वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा व्हायरल होत आहे की, वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा आहे. वक्फ बोर्डाकडे 3,804 चौ. किमी जमीन आहे तर पाकिस्तानचे क्षेत्रफळ 8.81 लाख चौ.किमी आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पाकिस्तानचे क्षेत्रफळ 8.81 लाख चौरस किलोमीटर आहे आणि वक्फ बोर्डाचे क्षेत्रफळ 9.40 लाख चौरस किलोमीटर आहे. एक पाकिस्तान बाहेर निर्माण झाला, एक आत निर्माण झाला.”
युजर्स ही पोस्ट शेअर करताना व्यंग्यात्मक पण झोंबणाऱ्या शब्दात कॅप्शनमध्ये लिहितात की, “चला आपण आता ” सेक्युलरिझम ” चा जयजयकार करूया आणि मस्त झोप घेऊया!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या भूक्षेत्रापेक्षा जास्त जमीन नाही.
पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासच्या वेबसाइटनुसार, पाकिस्तानचे भूक्षेत्र 881,913 चौरस किलोमीटर आहे, जे भारताच्या एकूण भूभागाच्या 27 टक्के आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) महितीनुसार भारतातील वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली एकूण 9.4 लाख एकर क्षेत्र आहे. म्हणजे 3804 चौरस किलोमीटर मालमत्ता आहे. जे व्हायरल दाव्यापेक्षा कमी आहे.
पुढे अधिक सर्च केल्यावर वक्फ मालमत्तांचे तपशील ‘वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली ऑफ इंडिया’च्या वेबसाइटवर आढळली. ही वेबसाईट अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि वक्फ बोर्डाच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेबद्दल तपशील माहिती देते.
वक्फ बोर्डाची मालमत्ता
द हिंदू आणि द इकॉनॉमिक टाइम्सनेदेखील आपल्या लेखामध्ये स्पष्ट केले की, सध्या वक्फ बोर्डाचे संपूर्ण भारतभरात 9.4 लाख एकर (3804 चौरस किलोमीटर) क्षेत्रफळ असलेल्या भागात 8.7 लाख मालमत्तांवर नियंत्रण आहे. ज्याचे अंदाजे मूल्य 1.2 लाख कोटी रुपये आहे.
वक्फ बोर्डा तिसऱ्या क्रमांकावर
सध्या, भारत सरकारकडे सर्वात जास्त जमीनीची मालकी आहे. भारत सरकारकडे 15 हजार 531 चौरस किलोमीटर जमीन आहे. यानंतर कॅथोलिक चर्चकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त जमीन आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्ड आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा असून वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन नाही. त्यांच्याकडे 9.40 लाख चौ.कि.मी नाही तर 9.4 लाख एकर अर्थात 3,804 चौ.कि.मी जमीन आहे. खोट्या दाव्यासह ही पोस्ट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:वक्फ बोर्डाकडे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन नाही; खोटा दावा व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
