
राजस्थानमधील कोटा शहर आयआयटी प्रवेश परीक्षांच्या कोचिंगचे हब मानले जाते. तसेच या ठिकाणी अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करतात. याच पार्श्वभूमीवर एका मुलीचा फोटोसोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोबत दावा केला जात आहे की, या मुलीचे नाव कृती असून तिने सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येसाठी कोचिंग संस्था जबाबदार असल्याचे सांगत ती लवकरात लवकर बंद करावी, अशी विनंती केली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मुलगी कोटा विद्यार्थिनी कृती नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जोती ठाकूर आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटो शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “कोटा येथे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनी कृतीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की – “मी भारत सरकार आणि मानव संसाधन मंत्रालयाला सांगू इच्छिते की जर त्यांना कोणत्याही मुलाचा मृत्यू होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी हे कोचिंग बंद करावे. संस्थांना शक्य तितक्या लवकर द्या.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तसेच टीव्ही-9 भारत समाचार नामक एका वृत्त संस्थेने ही बातमी आपल्या वेबसाईटवर शेअर केली आहे.
मूळ पोस्ट – टीव्ही ९ भारत समाचार | आर्काइव्ह | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमधील मुलगी विद्यार्थिनी कृती नाही.
‘@tissa_vaasi.06’ नामक इंस्टाग्राम अकाउंटने 14 डिसेंबर 2024 रोजी हाच फोटो शेअर केला होता.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
हा फोटा जोती ठाकूर नामक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा असल्याचे समोर आले.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल झाल्यावर जोती ठाकूरने समोर येऊन स्पष्ट केले की, व्हायरल फोटोमधील मुलगी मी असून माझे नाव जोती ठाकूर आहे. मी आत्महत्या केली नसून सुखरुप आहे. मी कोटामध्ये शिकत नाही. खोट्या दाव्यासह ही बातमी व्हायरल होत आहे.
कोटामध्ये कृतीची आत्महत्या
हिंदूस्तान टाईम्सच्या बातमीनुसार कोटामध्ये शिकत असलेल्या 17 वर्षीय कृती त्रिपाठीने 28 एप्रिल 2016 रोजी पाच मजली इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली होती.
सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, “भारत सरकार आणि मानव संसाधन विकास (एचआरडी) मंत्रालयाला कोचिंग संस्था विद्यार्थ्यांच शोषण करत असून त्या लवकरात लवकर बंद करण्यात यावी.” संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
खालील स्क्रीनशॉटमध्ये आपण कृती त्रिपाठी आणि तिचे आई-वडील पाहू शकतो.
मूळ पोस्ट – हिंदूस्तान टाईम्स
कोटामध्ये आत्महत्येचे सत्र सरुच
आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 7 जानेवारी रोजी आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या 19 वर्षीय नीरजने सर्वप्रथम आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी, 20 वर्षीय अभिषेकचा मृतदेह सापडला, जो जेईई परीक्षार्थी देखील होता. 16 जानेवारी रोजी, एका 18 वर्षीय तरुणाचाही मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या जेईई परीक्षेच्या चार दिवस आधी आणखी एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. गेल्या वर्षी कोटामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांना वगळून 17 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. 2023 च्या तुलनेत ही 38 टक्के घट होती, ज्यात 23 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील मुलगी कृती नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जोती ठाकूर आहे. 2016 मध्ये कृती त्रिपाठी नामक विद्यार्थिनीने आत्महत्या करुन सुसाईड नोटमध्ये कोचिंग संस्था बंद करण्याची विनंती केली होती. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल फोटोमधील मुलगी कोटामध्ये आत्महत्या करुन सुसाईड नोट लिहिणारी कृती नाही; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
