
बांगलादेशाच्या नावाने अनेक असंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एक व्हिडिओमध्ये काही माथेफिरू तरूण एका गाईला मारताना दिसतात.
दावा केला जात आहे की, बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिराच्या गोशाळेवर हल्लाकरुन गाईला सळई-काठीने मारण्यात आले.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही माथेफिरू तरूण एका गाईला मारताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेश इस्कॉन मंदिराच्या गोशाळेवर हल्ला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ही घटना बांगलादेशमधील नाही.
पंजाब केसरीने 15 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, ही घटना पंजाबमधील जालंधर शहरातील आहे. तेथील जमशेर दूध डेअरी या ठिकाणी 3-4 तरुणांनी एका बैलाला मारहाण केली होती. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
मूळ – पंजाब केसरी
ट्रिब्यून इंडियाच्या बातमीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या श्रीष्ट बक्षी आणि रहिवाशांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती.
लोकांच्या तक्रारीनंतर जालंधरमधील सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची दखल घेण्यात आली. पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीला प्राणी क्रूरता अधिनियमाच्या (1960) कलम 325 अंतर्गत एफआयआर दाखल केली.
जालंधरमध्ये प्राणीहक्कासाठी काम करणाऱ्या ‘ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन’ने 13 नोव्हेंबर रोजी हाच व्हिडिओ संस्थेच्या फेसबुक पेजवर शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये संस्थेचे अध्यक्ष युवी सिंग यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
फॅक्ट क्रेसेंडोने युवी सिंगशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल व्हिडिओ जालंधरचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी या विरोधात एफआयआर देखील केल्याचे सांगितले.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशचा नाही तर पंजाबमधील जालंधर शहरातील गोशाळेचा आहे. या व्हिडिओला सांप्रदायिक रंग देऊन शेअर केले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पंजाबमधील गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ बांगलादेशच्या नावाने सांप्रदायिक रंग देऊन व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
