संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणतात की, “आपले सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल.”

दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचे सरकार आल्यावर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये संजय राऊत “आपले सरकार” म्हणजे महायुतीच्या सरकारवर टीका करताना म्हटले होते कि शिंदे शिवसेना-भाजप सरकार दाऊदला क्लिन चीट देईल.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “उद्धव ठाकरेंचा मुस्लिमांना नवा वादा. पवार साहेबांचं स्वप्न ठाकरे पूर्ण करणार सत्तेत आल्यावर दाऊदला क्लीन चिट देणार.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बघा हा देशद्रोही काय म्हणतोय ह्याच्या सकट ह्याच्या पक्षाला धडा शिकवा !”

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप 6 दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेतील आहे.

एएनआय न्यूजने या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ 22 ऑक्टोबर रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.

वरील पत्रकार परिषदमध्ये 15:17 मिनिटावर एक पत्रकार संजय राऊत यांना प्रश्न विचारतो की, ‘हिंडेनबर्ग’ने सेबीच्या अध्यक्षांवर केलेल्या आरोपवर सरकारने त्यांना क्लीन चिट दिली आहे.

पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच संजय राऊत म्हणतात की, “हे बघा, हे सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमलादेखील क्लीन चिट देईल. निवडणुकीमध्ये राम रहीम, छोटा शकील, दाऊद इब्राहिम आणि इतर लोकांची मदत घेतील जाते आणि या मोबदल्यात त्यांना क्लीन चिट दिली जाते. महाराष्ट्रातदेखील सचिन वाजे यांना जामीन मिळाला आहे.” 

खालील तुलमात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करुन अर्धवट क्लिप खोट्या दाव्यासह पसरविली जात आहे.

जुने वक्तव्य

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आमदार रवींद्र वायकर यांना जुलै महिन्यात कथित जोगेश्वरीतल्या भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली. या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणतात की, “सरकारने आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणे बाकी आहे.”

हे वक्तव्य येथे वाचू शकता.  

तसेच संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये संजय राऊत शिंदे-भाजपच्या महायुती सरकारवर टीका करताना हे वक्तव्य करतात. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Altered