
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. सध्या त्याविरोधात राहुल गांधींनी बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रे’ची सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विराट गर्दीचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, ही गर्दी बिहारमधील राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’ची आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून 2022 मधील कर्नाटकमधील ‘भारत जोडो यात्रे’चा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांची अलोट गर्दी दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हवेचा रोख बदलतो आहे. ही येणाऱ्या वादळाची नांदी ठरेल. आज ” मत चोरी ” वरून संपूर्ण देश ढवळून निघाला. आज बिहार मद्ये निघालेल्या यात्रेत राहुल गांधी यांच्या समर्थनात उसळलेला जनसागर लाखो युवक रस्त्यावर उतरले महिला देखील सहभागी झाल्या. जनतेला देखील कळते खर काय खोटं काय.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्यावर ‘@DKShivkumar’ असे लिहिलेले आढळते.
हा धागा लक्षात घेत सर्च केल्यावर कळाले की, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हाच व्हिडिओ 22 ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरुन शेअर केला होता.
व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये ‘भारत एकता यात्रे’मुळे कर्नाटकमधील प्रत्येकाच्या मनात एक ज्योत पेटवली आहे, असे लिहिले होते.
ही भारत जोडो यात्रा आहे का ?
पुढे सर्च केल्यावर कळाले की, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी 10 सप्टेंबर 2022 रोजी ट्विट करत सांगितले की, “भारत जोडो यात्रचे नाव कर्नाटकसाठी भारत एकता यात्रा असेल, जी 30 सप्टेंबर रोजी चामराजनगर येथून सुरू होईल आणि रायचूर येथे संपेल.”
राहुल गांधी बिहार दौरा
काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी 17 ऑगस्ट रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यात ऐतिहासिक शहर सासाराम येथून ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. राहुल गांधी 16 दिवसांच्या या यात्रेत कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
या यात्राते थेट प्रसारण राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बिहारच्या ‘मतदार हक्क यात्रे’चा नाही. मुळात ही गर्दी 2022 मधील कर्नाटकच्या भारत जोडो यात्रेतील आहे. भ्रामक दाव्यासह जुना व्हिडिओ सध्या सुरु असलेल्या यात्रेशी जोडून शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’ची बिहारमधील गर्दी म्हणून कर्नाटकमधील ‘भारत जोडो यात्रे’चा जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
