संजय राऊत यांनी राहुल गांधींवर टीका केल्याचे ट्विट सध्याचे नाही; 11 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल

Missing Context राजकीय | Political

काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये पूरस्थिती असताना राहुल गांधी मलेशियात कथितरीत्या सुट्टीवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. या पार्श्वभूमीवर एका ग्राफिकसोबत एएनआयच्या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, “राहुल गांधी निकालापासून पळ काढून परदेशी जातात.” 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी हे वक्तव्य अलिकडे केले आहे. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वक्तव्य 11 वर्षांपूर्वीचे असून तेव्हा शिवसेना (विभक्त होण्याआधीची) भाजपसोबत आघाडीत आणि काँग्रेस विरोधीपक्ष होता.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिकमध्ये एएनआयचा लोगो असलेला ट्विटचा स्क्रिनशॉट दिसतो ज्यामध्ये संजय राऊत लिहितात की, “16 मे रोजी होणाऱ्या निकालांमुळे राहुल गांधी निराश होतील… म्हणूनच ते परदेशात गेले आहेत.”

युजर्स हे ग्राफिक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राऊत  यांनी आता काँग्रेसला संपवायचाही विडा उचलला आहे का ?”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

शिवसेना (उबाठा) सध्या काँग्रेसच्या इंडिया आघाडीची सदस्य आहे. खासदार संजय राऊत यांनी सध्या असे वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एएनआयने हेच ट्विट 15 मे 2014 रोजी शेअर केल्याचे आढळले. अर्थात हे ट्विट 11 वर्षांपूर्वीचे आहे.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

काय आहे पूर्ण प्रकरण ?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मे 2014 मध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या निरोप समारंभात अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली होती. परंतु, राहुल गांधी या कार्यक्रमात गैरहजर होते.

तेव्हा ‘राहुल गांधींनी निवृत्त होणाऱ्या पंतप्रधानांचा अनादर केला’ अशी टीका विरोधीकांनी केली होती.

याच घटने संदर्भात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणतात की, “राहुल गांधी परदेशी आहेत, ते सुट्टीसाठी भारतात येतात आणि त्यांचे काम संपल्यावर ते त्यांच्या परदेशी घरी परत जातात.” 

पुढे ते म्हणतात की, “16 मे रोजी होणाऱ्या निकालांमुळे राहुल गांधी निराश होतील… म्हणूनच ते परदेशात गेले आहेत. कदाचित ते परदेशात राहण्याची तयारी करत त्यांची निराशा लपवण्यासाठी गेले असतील.” अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – बिझनेस स्टॅंडर्ड

एनडीए आणि इंडिया आघाडी

2014 साली शिवसेना भाजपसोबत एनडीएमध्ये सामील होते. राऊत यांचे हे ट्विट तेव्हाचे आहे. 

तथापि, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर, मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी झालेल्या वादानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती केली.

पुढे, 2022 मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेना पक्षाचा अधिकार मिळाला. पुढे शिंदेंची शिवसेना लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग झाली.

तसेच, काँग्रेस आपल्या नेतृत्वाखाली 18 जुलै 2023 रोजी इंडिया आघाडी नामक बहुपक्षीय राजकीय युती करते. ज्यामध्ये शिवसेनासोबत (उबाठा) 25 राजकीय विरोधीपक्षांचा समावेश आहे. आधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असून ते ट्विट सध्याचे नाही. एएनआयने हे ट्विट 2014 मध्ये केले असून तेव्हा शिवसेना भाजप समर्थक आणि काँग्रेस विरोधीपक्ष होता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:संजय राऊत यांनी राहुल गांधींवर टीका केल्याचे ट्विट सध्याचे नाही; 11 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Missing Context


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *