Fact-Check: ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरवरून अनफॉलो केले का? वाचा सत्य

Missing Context राजकारण | Politics

सध्या अमेरिका आणि भारत या दोन्ही राष्ट्रांचे परस्परसंबंध ताणलेले असताना सोशल मीडियावर वावड्या उठत आहेत की, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाऊट हाऊसने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर (आता एक्स) अनफॉलो केले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो करण्याची बातमी चार वर्षांपूर्वीची म्हणजेच 2020 मधील असून जुनी बातमी चुकीच्या संदर्भासह शेअर केली जात आहे.

काया आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये ‘आजतक’ वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. ज्यामध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या छायाचित्रासह म्हटले आहे की, “व्हाईट व्हाऊसने मोदींना अनफॉलो केले.”

मूळ पोस्ट – फेसबुक

या बातमीला सत्य मानून अनेक युजर्स मोदीसमर्थाकांवर ताशेरे ओढत आहेत. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमधील ‘आजतक’ वाहिनीची मूळ बातमी शोधली. त्यातून असे कळाले की, ती बातमी 29 एप्रिल 2020 रोजी प्रकाशित झाली होती. 

मूळ बातमीनुसार, अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये (2020) भारताच्या दौऱ्यावर आले असता तेव्हा व्हाईट हाऊसने भारत सरकारच्या काही प्रमुख निवडक ट्विटर अकाउंट्सना फॉलो केले होते. यामध्ये पंतप्रधानांचे कार्यालय (पीएमओ), राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि अमेरिकेचे भारतातील तत्कालिन राजदूत केन जस्टर यांच्या ट्विटर अकाउंट्सचा समावेश होता.

त्यानंतर कोविडकाळात भारताने अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्विन नामक औषध निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 10 एप्रिल 2020 रोजी व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रपती यांच्या अकाउंट्सना फॉलो केले होते.

परंतु, काही दिवसांनंतर व्हाईट हाऊसने या सर्व अकाउंट्सना अनफॉलो केले. यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले होते की, व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अनफॉलो केल्यामुळे मी निराश झालो. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची जरून नोंद घ्यावी.

मूळ पोस्ट – ट्विटर

अनफॉलो का करण्यात आले?

अनफॉलो करण्यावरून तीव्र प्रतिक्रिया आणि टीका होऊ लागल्यानंतर व्हाईट व्हाऊसने याविषयी स्पष्टीकरण दिले होते.

शिखर संमेलने किंवा राष्ट्रभेटीसारख्या महत्त्वाच्या राजनैतिक कार्यक्रमांच्या कार्यकाळादरम्यान व्हाईट हाऊस परदेशी नेते आणि तेथील सरकारी संस्थांच्या ट्विटर खात्यांना फॉलो करत असते. 

“व्हाईट हाऊस सामान्यत: केवळ अमेरिकेच्या सरकारी ट्विटर अकाउंट्सला फॉलो करते. परंतु, राष्ट्राध्यक्षांच्या परदेशी दौऱ्यादरम्यान भेटीच्या पोस्ट शेअर करण्याच्या उद्देशाने त्या त्या राष्ट्रातील सरकारी खात्यांना तेवढ्यापुरते फॉलो करण्यात येते,” असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते.

थोडक्यात काय तर, दौऱ्याच्या समाप्तीनंतर किंवा राजनैतिक उद्देश पूर्ण झाल्यावर व्हाईट हाऊस या खात्यांना अनफॉलो करू शकते.

मूळ बातमी – द हिंदू

डोनाल्ड ट्रम्प 2020 साली निवडणूक हारल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. सध्यादेखील तेच राष्ट्रपती आहेत. 

गेल्या नोव्हेंबर महिन्यात ट्रम्प यांनी बायडेन यांचा पराभव करून पुन्हा एका राष्ट्राध्यक्ष होण्याची किमया केली. 20 जानेवारी 2025 रोजी शपथविधीनंतर अधिकृतीरीत्या व्हाईट हाऊसचा कारभार हाती घेतील. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो करण्याची बातमी चार वर्षे जुनी आहे. त्या घटनेचा आणि सध्याच्या अमेरिकी सरकाचा किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा तिच्याशी काही संबंध नाही. जुनी बातमी चुकीच्या संदर्भासह शेअर करून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पसरविल्या जात आहेत. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:Fact-Check: ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरवरून अनफॉलो केले का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar  

Result: Missing Context