नितीन गडकरी यांनी “राहुल गांधी खूप मोठे आहेत” अशी स्तुती केली का; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

केंद्रीय परिवहन मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधीबद्दलचे मत विचरल्यावर नितीन गडकरी त्यांची स्तुती करताना दिसतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांनी राहुल गांधींची “ते खूप मोठे आहेत,” अशी स्तुती केली नव्हती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मुलाखतकार नितीन गडकरींना प्रश्न विचारतो की, ते राहुल गांधींना कसे पाहतात? या प्रश्नानंतर गडकरी म्हणतात की, “मी ज्यांना लहान समजत होतो, ते खूप मोठे आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, बीबीसी न्यूज हिंदीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने या मुलाखतची पूर्ण आवृत्ती 10 ऑक्टोबर रोजी शेअर केली होती.

संपूर्ण मुलाखत पाहिल्यावर लक्षात येते की, या ठिकाणी नितीन गडकरी यांनी राहुल गांधींना कुठेही ते मोठी व्यक्ती असल्याचे म्हटलेले नाही.

26:58 मिनिटावर गडकरींना प्रश्न विचारला जातो की, राहुल गांधींना तुम्ही कसे पाहता? 

यावर गडकरींनी उत्तर देतात की, मी सर्वांना चांगलेच पाहतो.

पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर नितीन गडकरी आपले जीवन अनुभव सांगतात की, “तुम्हाला माहित नसेल, कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे ज्येष्ठ नेते एबी वर्धन नागपूरचे होते. मी त्यांना लहानपणापासून पाहिले आहे. ते माझ्यासाठी एक मोठे आदर्श (आयकॉन) आहेत. त्यानंतर कृषी संघटनेत शरद जोशी होते. ज्यांच्या कडून मला खूप शिकायला मिळाले. मी त्यांना खूप मानतो. मी नुकतेच संघात एक इंग्रजीत पुस्तक लिहिले असून ते सध्या प्रकाशित झाले नाही. संघात काम केलेले बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरस असे बरेच लोक आहेत, ज्यांची मला प्रेरणा मिळाली.”

पुढे ते सांगतात की, “एक गोष्ट सांगून मी शेवट करू इच्छितो. दिल्लीत आल्यानंतर एक गोष्ट अनुभवली की, मला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. क्रिकेटपटू, चित्रपट अभिनेते, बिल गेट्सपासून ते जगभरातील लोकांना भेटलो. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की, ज्यांना मी दुरूनच मोठ समजत होतो. त्यांच्या जवळ गेल्यावर मला कळले की, ते लहान आहेत आणि दुरून मी ज्यांना लहान समजत होतो. त्यांच्या जवळ गेल्यावर कळले की, ते खूप मोठे आहेत. त्यामुळे व्यक्तींचा चांगुलपणा आणि गुणवत्ता यावर माझा विश्वास आहे. अगदी लहान व्यक्तीही तुम्हाला खूप काही शिकवून जाते.”

अर्थात नितीन गडकरी हे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दल भाष्य करत नव्हते हे इथे स्पष्ट होते.

हीच मुलाखत नितीन गडकरींनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटर अकाउंवर शेअर केली आहे.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून चुकीच्या दाव्यासह वक्तव्य पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळात नितीन गडकरी राहुल गांधींबद्दल वैयक्तिक भाष्य करत नव्हते. मूळ व्हिडिओचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून चुकीच्या दाव्यासह वक्तव्य पसरविले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नितीन गडकरी यांनी “राहुल गांधी खूप मोठे आहेत” अशी स्तुती केली का; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Altered