छावा चित्रपट बघून लोकांनी हाजी अलीला जाऊन रामनामाचा जयघोष केला का ? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याच पर्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये काही लोक दर्गामध्ये प्रवेश करुन आरती म्हणताना दिसतात.

दावा केला जात आहे की, “थेटर मध्ये छावा फिल्म बघितल्यानंतर शो सुटल्यानंतर सर्व लोक हाजी अलीमध्ये शिरले आणि रामनामाचा जयघोष केला.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ ‘छावा’ चित्रपटाशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक दर्गामध्ये गणपतीची आरती आणि रामनामाचा जयघोष करताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “थेटर मध्ये छावा फिल्म बघितल्यानंतर शो सुटल्यानंतर सर्व लोक हाजी अली मध्ये शिरले आणि कोणतेही आक्षेपार्ह वर्तन न करता रामनामाचा जयघोष केला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हाजी आली दर्गामध्ये असा कोणता जमाव शिरला असता तर ही मोठी बातमी ठरली असती परंतु, अशी कोणतीही बातमी माध्यमांवर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर इव्रिथिंग टाईम्स न्यूज नामक इंस्टग्राम पेजने 15 फेब्रुवारी रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हाजी मलंग दर्ग्यावर उर्स निमित्त हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत प्रवेश केला आणि आरती केली.”

हाच व्हिडिओ आपण येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

तसेच खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला “आई भवानी शक्ती दे, मलंग गडाला मुक्ती दे’ अशा घोषणा ऐकायला मिळतील.

आर्काइव्ह

एकनाथ शिंदेंची हाजी मलंग दर्ग्याला भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 13 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेनिमित्त मलंग गडावर आरती केली होती.

मलंग गडाच्या या भेटीचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला.

मलंग गडाचा वाद काय ?

गोरक्षनाथ पंथावर विश्वास ठेवणारा एक गट म्हणतो की, मलंग गडावरील समाधी नाथ पंथातील संत मच्छिंद्र नाथांची आहे. या ठिकाणी दररोज पूजा करुन प्रसाद वाटला जोतो आणि दरवर्षी पालखी काढली जाते.

तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, ही 13 व्या शतकात येमेनहून आलेले सूफी संत हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ ​​मलंग बाबा यांची कबर आहे.

यावरून दोन्ही गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असून त्यांनी जमिनीचा प्रत्येकी एक भाग ताब्यात घेतला आहे. तसेच 80 च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ छावा चित्रपटाशी सोबत नाही. मुळात हा व्हिडिओ हिंदू मंचच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमधील मलंग गडावर केलेल्या आरतीचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या  व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छावा चित्रपट बघून लोकांनी हाजी अलीला जाऊन रामनामाचा जयघोष केला का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading